लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण, डोंबिवली लोकलमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यात अलीकडे गर्दुल्ले, मद्यपी आसनावर बसून प्रवास करतात. रेल्वे स्थानकात लोकल येऊनही ते आपले आसन सोडत नाहीत. त्यांना उठवले तर हल्ला करण्याची किंवा मारण्याची भीती असल्याने कोणी प्रवासी त्यांच्या वाट्याला जात नाही, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

डोंबिवली, कल्याण लोकलमधून प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करणारे प्रवासी हा अनुभव दररोजचा घेत आहेत. या गर्दुल्यांना डब्यातून हटविण्यासाठी रेल्वे स्थानकावर अनेक वेळा सकाळच्या वेळेत लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाचे जवान स्थानकावर नसतात. पोलिसांशिवाय डब्यातून गर्दुल्ल्यांना उतरवणे अवघड होते, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ पहाटेपासून वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त, रिक्षा चालकांची शिस्तीने वाहतूक सुरू

रात्रीच्या वेळेत बहुतांशी गर्दुल्ले मुंब्रा रेल्वे स्थानक, दिवा, कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान वस्तीला असतात. सकाळच्या वेळेत कल्याण दिशेने येणाऱ्या डोंबिवली, कल्याण लोकलमध्ये प्रथम श्रे्णीचा डबा खाली असल्याने ते या डब्यात बसण्यास प्राधान्य देतात.

डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात फलाटावर लोकल आली की प्रवासी घाईने आसन पकडण्यासाठी लोकल मध्ये चढले की प्रथम त्यांना गर्दुल्ला किंवा मद्यपी यांचे दर्शन होते. त्यांच्या आसनावर किंवा शेजारी बसण्यास कोणी तयार नसते. आसन खाली असुनही त्या जागेवर बसण्यास कोणी प्रवासी तयार होत नाही, असे प्रवाशांनी सांगितले.

आणखी वाचा- उल्हासनगरमधील पती-पत्नी हत्येतील आरोपींची मोक्कातून निर्दोष मुक्तता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक रेल्वे स्थानकात २४ तास रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात. तरीही दिवसा फेरीवाले, गर्दुल्ले, मद्यपी फलाटावर येतात कसे आणि लोकलमधून प्रवास करण्याचे धाडस करतात कसे. प्रवाशांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला की मग यंत्रणा खडबडून जागे होते. काही गैरप्रकार होण्यापूर्वीच मध्य रेल्वे प्रशासनाने दिवसभरात फलाटावर गर्दुल्ले, मद्यपी येणार नाहीत यादृष्टीने काळजी घेण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाला द्यावेत. सकाळच्या वेळेत फलाटावर रेल्वे सुरक्षा जवान तैनात असावेत, अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी अनेक वेळा रेल्वेच्या वरिष्ठांकडे केली आहे.