आज दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास ट्रान्स हार्बल मार्गावरील कोपरखैरणे घणसोली स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक बंद पडली होती . हा बिघाड ठाणे वाशी मार्गिकेवर झाला असला तरी दोन्ही मार्गावरील तसेच ट्रान्स हार्बलची ठाणे पनवेल सेवाही बंद ठेवण्यात आली होती. सुदैवाने आज शनिवार असल्याने अनेक कार्यालय बंद आहेत. त्यात गर्दीच्या वेळी हा प्रकार न झाल्याने प्रवासी संख्या कमी होती. असं असलं तरी या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागला.

या बाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी सांगितले की दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. ही घटना घडल्या नंतर नवी मुंबई परिवहन सेवेच्या अतिरिक्त गाड्या या मार्गावर सोडण्यात आल्या. मात्र प्रवासी संख्या पाहता ही बस सेवाही तोकडी पडली होती. १२.४० ला झालेला बिघाड हा ३ वाजून १० मिनिटांनी दुरुस्त करण्यात मध्य रेल्वेला यश आले आणि लगेच लोकल वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली.