ठाणे: एप्रिल महिन्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ झाल्याचे चित्र होते. या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले. अशातच मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच हे तापमान कायम आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील मुख्य वर्दळीचे रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र दुपारच्या वेळात दिसून येत आहे. साधारणत: दुपारी १२ नंतर सायंकाळी ५ पर्यंत हे रस्ते ओसाड पडलेले दिसत आहेत. इतर वेळेस गजबजलेल्या बाजारपेठा, बसस्थानके आणि मुख्य रस्तेही दुपारच्या वेळेत निर्मनुष्य असतात.
ठाणे शहर हे अनेक नागरिकांच्या सोयीचे शहर म्हणुन ओळखले जाते. अनेक नागरिक मागील काही वर्षात वास्तव्यासाठी या शहराचा पर्याय निवडताना दिसून आले. त्यामुळे शहराची लोकसंख्या जास्त असल्याचे दिसून येते. शहरातून अनेकजण मुंबई, नवी मुंबई असा प्रवास करतात. तर इतर शहरातून अनेक नागरिक कामानिमित्त ठाणे शहरात येत असतात. त्यामुळे ठाणे शहर कायमच गजबजलेला दिसून येते. तसेच ठाणे शहरात अनेक निसर्गरम्य ठिकाणे, तलाव विविध उद्याने, मंदिरे असल्याने अनेक नागरिक येथे पर्यटनासाठी येत असतात. यामुळे शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते कायमच नागरिकांच्या रहदारीने भरलेले असतात.
मात्र, मागील महिन्यापासून तापमानात होणारी तर काही वेळेस हे तापमान चाळीशी पार गेल्याचे दिसून आले. या वाढत्या उष्णतेपासून बचावाकरिता नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन कामाकरिता नागरिक सकाळी किंवा सायंकाळी घराबाहेर निघत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. उकाड्यामुळे घरात थांबणे पसंत करणाऱ्या नागरिकांमुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते मात्र शांत आणि ओसाड असल्याचे समोर येत आहे.
तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरात २५ ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई काही दिवसांपुर्वी सुरू केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता आणखी २५ पाणपोई पालिकेने सुरू केल्या आहेत. पाणपोईच्या ठिकाणी पाण्याचे मोठे माठ आणि पाणी पिण्यासाठी ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित स्वयंसेवी संस्था करीत आहे.
ठाणे शहरात उष्णतेचे वाढलेले प्रमाण पाहून, या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने काही महत्वाच्या सुचना देखील नागरिकांना केल्या आहेत. यामध्ये उष्मघातापासून बचावासाठी नागरिकांनी शीतपेय प्यावे, आहारातील समतोल, घराबाहेर पडताना घ्यायवयाची काळजी अशा विविध सुचना केल्या आहेत. त्याचप्रकारे उष्माघातामुळे होणारी ताप, ग्लानी, संभ्रमावस्था अशी लक्षणे आढळली तर, ताबडतोब महापालिकेच्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात किंवा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नागरिकांना जाण्याचे आवाहन देखील पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.