scorecardresearch

ठाणे : दसरा मेळाव्यामुळे आज रेल्वे आणि रस्ते मार्ग होणार तुडूंब

शिंदे समर्थक रस्ते मार्गे तर, ठाकरे गट रेल्वे मार्गे प्रवास

ठाणे : दसरा मेळाव्यामुळे आज रेल्वे आणि रस्ते मार्ग होणार तुडूंब
ठाणे – रेल्वे आणि रस्ते मार्ग होणार तुडूंब, दसरा मेेळाव्यामुळे आज रेल्वे आणि रस्ते मार्ग होणार तुडूंब

ठाणे : शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांकडून यंदा मुंबईत दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्याकरिता जास्तीत जास्त गर्दी करण्याकरिता दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशाचप्रकारे शिवसेनेतील बंडखोरीचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे शहरासह जिल्ह्यातून दोन्ही गटांचे समर्थक मुंबई दसरा मेळाव्यासाठी दाखल होणार असून त्यासाठी दोन्ही गटांकडून कार्यकर्त्यांच्या वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शिंदे समर्थक रस्ते मार्गे तर, ठाकरे गट रेल्वे मार्गे प्रवास करणार आहेत. यामुळे मेळाव्याच्या निमित्ताने आज रेल्वे आणि रस्ते मार्ग तुडूंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा… “तुमच्या दसरा मेळाव्यातील भाषणासाठी काही मुद्दे…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला; भाषणावरून लगावला टोला!

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली. बाळासाहेबांच्या निधनानंतरही शिवसेनेने ही परंपरा पुढे कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले असून या दोन्ही गटांकडून शिवसेना आमचीच असल्याचे दावे केले जात आहे. या दोन्ही गटांचा वाद न्यायालयापर्यंत पोहचला आहे. असे असतानाच, शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता दोन दसरा मेळावे होणार आहेत. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात तर, शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानात होणार आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी करण्याकरिता दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशाचप्रकारे शिवसेनेतील बंडखोरीचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे शहरासह जिल्ह्यातून दोन्ही गटांचे समर्थक मुंबई दसरा मेळाव्यासाठी दाखल होणार असून त्यासाठी दोन्ही गटांकडून कार्यकर्त्यांच्या वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. शिंदे गटाने ठाण्यातील प्रत्येक शाखेतून मेळाव्याकरिता येणाऱ्या शिवसैनिकांसाठी वाहनांची व्यवस्था केली असून २५० बसगाड्या तर, ५५० छोटी खासगी वाहने बीकेसी मैदानाच्या दिशेने आज रवाना होणार आहेत. यामुळे शहरातील महामार्गांसह अंतर्गत मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तर, ठाकरे गटाचे समर्थक जांभळी नाका येथे एकत्रित येऊन ढोल-ताशांच्या गजरात ठाणे रेल्वे स्थानकात जाणार आहेत आणि तेथून ते रेल्वे मार्गे दादर येथे जाणार आहेत. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि त्या पुढील शहरातील शिवसैनिकही रेल्वे मार्गेच प्रवास करणार आहेत. तर, ग्रामीण भागातील शिवसैनिक मात्र वाहनाने प्रवास करणार आहेत.

हेही वाचा… ‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल

ठाणे शहरातील प्रत्येक शाखेतून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी येणार असून त्यांच्यासाठी २५० बसगाड्या आणि ५०० खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे २० हजाराहून अधिक शिवसैनिक मेळाव्यात सामील होतील. – नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील शिवतीर्थावर जाण्याची परंपरा शिवसैनिक कायम ठेवणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी उद्या, बुधवार दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर दुपारी साडेतीन वाजता खासदार राजन विचारे व जिल्हाप्रमुख केदार दिघे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरातील हजारोच्या संख्येने शिवसैनिक रंगो बापूजी गुप्ते चौक तलावपाळी जांभळी नाका उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर वाजत गाजत ठाणे रेल्वे स्थानकावरून दादर स्थानकात उतरून शिवतीर्थावर जाणार आहेत. ठाणे शहरातून दहा हजाराच्या आसपास तर, जिल्ह्यातून ४० ते ५० हजार शिवसैनिक मेळाव्याला येतील. – चिंतामणी कारखानीस, शिवसेना, ठाणे जिल्हा प्रवक्ते

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या