ठाणे : अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर, आडवे झाले, त्यातून अजून सावरले नाही. आता कुणाच तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उठेगा नही, हे बोलणे त्यांना शोभत नाही, असा टोला लगावत पुर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झाले असते, याचा विचार त्यांनी करावा, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांना उद्देशून केले. तसेच फ्लावर आणि फायर कोण हे आगामी निवडणुकीत कळेल, असेही ते म्हणाले.
मुंबई येथील वरळी भागातील एनएससीआय डोम येथे शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. दाढीवरून अर्धा हात फिरवला होता. २०२२ मध्ये आम्ही उठाव केला. अन्यायाविरुद्ध उठाव केला. तेव्हापासून ते आडवे झाले. त्यातून सावरले नाही. अजूनही आडवेच झालेले आहेत. आता कुणाच तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उठेगा नही, हे बोलणे त्यांना शोभत नाही. मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, असा टोला शिंदे यांनी लगावला.
एकाने मराठी बद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली, असे सांगत शिंदे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले तर, दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. झेंडा नाही, अजेंडा नाही, असे काही लोक म्हणत होते. पण त्यातील एका वक्त्याने ते पथ्य पाळले. पण, दुसऱ्याने स्वार्थाचा आणि सत्तेचा अजेंडा एखाद्या निवडणुकांच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला, अशी टिकाही त्यांनी केली.
मोदींनाही सोडले नाही, हे दुदैव
मराठी बाबत जर बोलायचे झाले तर त्यांनी सुरूवातीला अभिमानाने राज्य गीत म्हटले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. कारण, मी मुख्यमंत्री असताना या गीताला मान्यता दिली. तसेच मी, देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार अशा आमच्या टिमने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. माझे जाऊद्या माझ्यावर टिका करतच असता, पण, ज्यांनी मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा दिला, त्या मोदींनाही त्यांनी सोडले नाही, हे दुदैव आहे. त्यातून त्यांची वृत्ती, द्वेष, पोटदुखी आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसाही दिसून आली, असे शिंदे म्हणाले.
युती आणि आघाडीसाठी शुभेच्छा
आजचा मेळावा मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी होता. परंतु त्यांच्या भाषणात आगपाखड, द्वेष, जळजळ, मळमळ दिसून आली. मी आरोपाला टिकेतून उत्तर देत नाही. कामातून उत्तर देतो. म्हणूनच मी मुख्यमंत्री आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने बहुमत देऊन उमुख्यमंत्री केले. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाबरोबर युती-आघाडी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील, तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील. त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत, असे शिंदे म्हणाले.
जनतेचा विश्वासघात केला
हिंदी अनिवार्य करण्याचे काम त्यांच्या मुख्यमंत्री काळातच झाले होते. आम्ही तर अनिवार्य शब्द काढून टाकला आणि अध्यादेशही रद्द केला. त्यामुळे त्यांनी केलेले चुकीची ते कुठेतरी माफी मागतील पण, तसे झाले नाही. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या. बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून जनतेने त्यांना विधानसभेत धोपटले. त्यांची जागा दाखवली. म्हणून आमचे ६० आमदार जनतेने निवडणुक दिले. त्यांनी शंभर लढविल्या आणि २० आमदार निवडुण आले. खुर्चीसाठी २०१९ मध्ये जनतेचा विश्वासघात केला. बाळासाहेबांचे विचार सोडले, अशी टिकाही त्यांनी केली.