डोंबिवली : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या एका ७० वर्षाच्या वृध्दाला भरधाव वेगात असलेल्या एका रिक्षा चालकाने जोराची धडक दिली. या धडकेत या वृध्दाला गंभीर दुखापत झाली आहे. या वृध्दाला कोणतीही मदत न करता रिक्षा चालक नेहरू मैदान दिशेने रिक्षेसह पळून गेला.

कल्याण, डोंबिवलीत अशा मुजोर, बेशिस्त रिक्षा चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक विभाग यांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन अशा मुजोर रिक्षा चालकांवर दंडात्मक आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चंद्रशेखर रघुनाथ पाटणकर (७०) असे रिक्षेच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ते डोंंबिवली पूर्वेतील मानव कल्याण केंद्र परिसरातील एका सोसायटीत राहतात. बुधवारी संध्याकाळी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला चंद्रशेखर पाटणकर फडके रोड भागात दसऱ्यानिमित्त वस्तू खरेदीसाठी आले होते. फडके रस्त्यावरील वृंदावन हाॅटेल समोरील रस्त्यावर खरेदी करत असताना अचानक त्या ठिकाणाहून भरधाव वेगात गर्दीतून वाट काढत रिक्षा चालक चालला होता. त्या रिक्षा चालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगातील रिक्षेची चंद्रशेखर पाटणकर यांना पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेत पाटणकर रस्त्यावर पडले. त्यांच्या हात, पायाला दुखापत झाली. वृध्द रस्त्यावर पडले म्हणून इतर पादचाऱ्यांनी त्यांना उठून एका बाकड्यावर बसविले. त्यांना पाणी पिण्यास दिले. या सगळ्या धावपळीत ठोकर मारणाऱ्या रिक्षा चालकाने तेथे थांबून पाटणकर यांना डाॅक्टरकडे उपचारासाठी नेणे आवश्यक होते. तो तेथून इतर नागरिकांना चकवा देत भरधाव वेगात नेहरू मैदान दिशेने रिक्षा घेऊन पळून गेला.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर चंद्रशेखर पाटणकर यांचे नातेवाईक आले. त्यांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रामनगर पोलीस ठाण्यात पाटणकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालका विरुध्द गु्नहा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी फडके रस्ता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या रिक्षा चालकाचा शोध घ्यावा आणि संबंधित रिक्षा चालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.

अलीकडे कल्याण, डोंबिवलीत गणवेश परिधान न करता, गुटखा चघळत अनेक तरूण रिक्षा मुजोरगिरी करत रिक्षेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करत आहेत. हे रिक्षा चालक प्रवाशांनी अरेरावीने वागत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता, पंडित दिनदयाळ चौक भागातील रिक्षा वाहनतळांवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांकडून काही भाई लोक दररोज ५० रूपये जबरदस्तीने मागणी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दिनदयाळ रस्त्यावर एका वाहनतळावर रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी लावायची असेल तर दररोज ५० रूपये आणि नवीन रिक्षा असेल तर सुरूवातीला एक हजार रूपये द्यावे लागत असल्याच्या काही रिक्षा चालकांनी तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणी आरटीओ, वाहतूक विभागाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे. यामुळेही अनेक रिक्षा चालक त्रस्त आहेत.