कल्याण: कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानका जवळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या वाहनतळाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने ३४ लाख १६ हजार ९६० रुपयांची वीजचोरी केल्याचे महावितरणच्या पथकाने नुकतेच उघडकीस आणले. याप्रकरणी एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनी व पर्यवेक्षक फौज सिंग यांच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पश्चिमेतील कल्याण जिल्हा न्यायालया समोर किंजल कंपनीकडून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या वाहनतळ उभारणीचे बांधकाम सुरू आहे. महावितरणच्या शिवाजी चौक शाखेचे सहायक अभियंता मोहम्मद शेख, दक्षता व अंमलबजावणी विभागाचे रामचंद्र मासाळे यांच्या पथकाने १९ डिसेंबरला या बांधकामाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. या तपासणीत बांधकामाच्या कामासाठी फिडर पीलरमधून थेट वीजवापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा: कल्याण: फलक लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर महापालिका दाखल करणार फौजदारी गुन्हे

अधिक तपासणीत सदर कंपनीने जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत विनामीटर ८४ हजार ३७२ युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३४ लाख १६ हजार ९६० रुपयांचे चोरीच्या विजेचे देयक भरण्याची नोटीस कंपनीला बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत या रकमेचा भरणा न झाल्याने सहायक अभियंता मोहम्मद शेख यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी सदर कंपनी व पर्यवेक्षक सिंग यांच्याविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक सागर चव्हाण या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity theft of 34 lakhs from the contractor of kalyan dombivli municipality tmb 01
First published on: 27-12-2022 at 18:06 IST