कल्याण – मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील खर्डी ते उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मुंबईकडे येणाऱ्या एका एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान बिघाड झाला. ही एक्सप्रेस खर्डी-उंबरमाळी रेल्वे स्थानक भागात खोळंबली असल्याने कसारा, नाशिककडून मुंबईकडे येणारी मेल, एक्सप्रेस आणि लोकलची वाहतूक मागील दीड तासाहून अधिक काळ ठप्प झाली आहे.
नाशिककडून एक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान येत होती. एक्सप्रेसने कसारा घाट सोडल्यानंतर कसारा रेल्वे स्थानक त्यानंतर खर्डी रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत होती. खर्डी ते उंबरमाळी रेल्वे स्थानक आल्यानंतर लोको पायलटला तांत्रिक संकेताप्रमाणे इंजिनमध्ये काही बिघाड असल्याचे निदर्शनास आले. खर्डी रेल्वे स्थानकाजवळ इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे मुख्य रेल्वे मार्गावर एक्सप्रेस खोळंबून राहिली.
रेल्वेचे तांत्रिक पथक तातडीने एक्सप्रेस बंद पडलेल्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी इंजिनमधील बिघाड दुरूस्तीचे काम सुरू केले. तोपर्यंत दीड तासाहून अधिक काळ गेला. या एक्सप्रेसमधील प्रवासी एकाच जागी बसून कंटाळले. या कालावधीत भुसावळ, नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या मेल, एक्सप्रेस, मालगाड्या त्या त्या भागात थांबविण्या आल्या. काही गाड्या बाजुच्या रेल्वे मार्गावर वळवून थांबून ठेवण्यात आल्या. कसाराकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल कसारा पट्ट्यात अडकून पडल्या.
दीड तासाहून अधिक काळ लोटला तरी एक्सप्रेस सुरू होत नसल्याने एक्सप्रेसमधील अनेक प्रवाशांनी डब्यातून उतरून रेल्वे मार्गालगतचे हिरवाईने बहरलेले डोंगर, डोंगर रांगांमधील ओहळ परिसरात फिरण्याचा आनंद लुटला. अनेकांनी या निसर्गरम्य वातावरणात सेल्फी काढून आपल्या एकाच जागी होणाऱ्या वेळकाढूपणावर पर्यटनाच्या माध्यमातून मात केली. घाईत असलेल्या मुंबईत येणाऱ्या काही प्रवाशांनी खर्डी दरम्यानच्या नाशिक-मुंबई महामार्गावर येऊन तेथून रस्ते मार्गाने मिळेल त्या वाहनाने मुंबईत येण्याचा प्रयत्न केला. मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस, मालगाड्या आणि कसाराकडे जाणाऱ्या लोकलची वाहतूक सुरळीत होती.
शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान खर्डी ते उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान एका एक्सप्रेसचे इंजिन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. इंजिनमधील तांत्रिक बिघाड काढण्याचे काम रेल्वेचे तांत्रिक पथक करत आहे. कसाराकडून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. शैलेश राऊत – अध्यक्ष, कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना.