दादर, कल्याण, मानखुर्द, चेंबूर स्थानकांतही हाच प्रकार

ठाणे स्थानकातील प्रवाशांच्या सेवेत असलेले आठ सरकते जिने जुलै महिन्यात तब्बल १० हजार ८४८ वेळा बंद पडले आहेत. ठाणे स्थानकापाठोपाठ दादर, कल्याण, मानखुर्द, चेंबूर स्थानकांतील सरकते जिनेही बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

काही टोळक्यांकडून हा प्रकार घडविला जात असल्याचा संशय आहे. आपत्कालीन बटन दाबणे, एखादी वस्तू अडकवणे इत्यादी कारणांमुळे जिने बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. सामानासह पुलांवर जाताना वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिलांना बरेच कठीण जाते. त्यामुळे सरकते जिने बसवण्याचा पर्याय रेल्वे प्रशासनाने निवडला. मध्य रेल्वेवर सध्याच्या घडीला ५४ स्थानकांत ७४ सरकते जिने आहेत. मात्र या जिन्यांचा काही टवाळखोर प्रवाशांकडून गैरवापर केला जात आहे.

एखादा आपत्कालीन प्रसंग घडल्यास मदत पोहोचावी यासाठी जिन्यावरच बटन उपलब्ध आहे. ते दाबल्यास जिना थांबतो आणि याची माहिती स्थानकात स्टेशन मास्तर कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याला मिळते आणि पुन्हा तो जिना अवघ्या काही मिनिटांत सुरू केला जातो. मात्र प्रवाशांकडून हे बटन विनाकारण दाबले जात आहे. त्यामुळे जिने थांबण्याचे प्रकारही वाढले आहेत, असा आरोप आहे.

याशिवाय एखादी वस्तू जिन्याच्या पायऱ्यांमध्ये अडकवण्याचेही प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा घटनांमुळे जुलै महिन्यात मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात असलेले आठ सरकते जिने प्रत्येक दिवशी सरासरी ३६१ वेळा बंद पडले आहेत. हे पाहता १० हजार ८४८ वेळा जिने बंद पडल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दादर स्थानकातही बसवण्यात आलेले सात सरकते जिने ६ हजार ६०० वेळा बंद पडले असून दर दिवशी ते बंद पडण्याचे प्रमाण २०० पेक्षा जास्त आहे. दादर स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर असलेला सरकता जिना गेल्या १३ ऑगस्टपासून बंदच आहे. या जिन्याला लागूनच असलेला काळ्या रंगाचा पट्टा (हॅण्ड ड्रील बेल्ट) कापण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा जिना सध्या बंदच ठेवला असून ३१ ऑगस्ट किंवा त्यानंतरच प्रवाशांच्या सेवेत कार्यरत होईल, असेही स्पष्ट केले.

मात्र या प्रकारामुळे नवीन पट्टा बसवण्यासाठी ४ लाखांहून अधिक खर्च येणार आहे. दादर स्थानकापाठोपाठ मुलुंड, भांडुप स्थानकांतही बाजूला लागूनच असलेले काळ्या रंगाचे पट्टे कापण्यात आले होते. त्यामुळे अशाप्रकारचे जिने बंद होत असून त्याचा नाहक त्रास प्रवासी आणि रेल्वे प्रशासनालाही होत आहे.

सुरक्षेचे काय? बहुतेक सर्व रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त असताना हजारो वेळा जिने बंद पाडणे काही टोळक्यांना कसे साधते, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटींचीही तपासणी व्हावी, अशी भावना व्यक्त होत आहे.