कल्याण : कल्याण पश्चिमेतील वायलेनगर येथील मोहन अल्टिजा इमारतीच्या तिसऱ्या मळ्यावर रविवारी सकाळी सहा वाजता शाॅर्ट सर्किट होऊन आग लागली. घरातील कुटुंबीय तात्काळ घरा बाहेर पडल्याने जीवित हानी झाली नाही. आगीत एका माळ्यावरील दोन सदनिका जळून खाक झाल्या. वायलेनगर भागात मोहन अल्टिजा इमारत आहे. पांडे यांच्या दोन सदनिका एकाच माळ्यावर आहेत. सकाळीच धुके असल्याने इमारतीला धुक्याने वेढले आहे असे सुरुवातीला रहिवाशांना वाटले. धुके वेगाने आकाशाच्या दिशेने का जाते म्हणून सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा यांना संशय आला. त्यांनी आणि पत्नीने गच्चीत येऊन पाहिले तर त्यांना इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर आग लागल्याचे दिसले. तो आगीचा धूर वरच्या दिशेने येत आहे असे समजताच अध्यक्ष शहा, इमारती मधील रहिवासी विजय इंगळे यांनी तात्काळ अग्निशमन जवान, पोलिसांना ही माहिती दिली.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : अकोल्यात घराच्या अंगणात लावली गांजाची झाडे; राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय इंगळे यांनी तात्काळ आग लागलेल्या सदनिकेतील रहिवाशांना शिडी लावून सुरक्षित मार्गाने बाहेर काढून तळ मजल्यावर आणले. घरात फर्निचर असल्याने आगीचा भडका उडाला होता. शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागल्याचे अध्यक्ष शहा यांनी सांगितले. आग लागलेल्या घरासमोरील चार रहिवाशांच्या घरांचे दरवाजे ज्वालांनी जळून खाक झाले. कल्याण, मुंबई परिसरातील उच्चपदस्थ अधिकारी, व्यावसायिक यांचे संकुल म्हणून मोहन अल्टिजा इमारत ओळखली जाते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ तिसरा माळा गाठून पाण्याचा मारा करुन आग विझवली. सोसायटीत आग लागताच सोसायटीचे उद्वाहन स्वयंचलित बंद झाले होते. रहिवाशांनी आगीचे गांभीर्य ओळखून तळमजल्याला येणे सुरू केले होते. तिसऱ्या माळ्यावर आग लागली होती, आगीची धग १८ व्या माळ्यापर्यंत लागत होती, असे अध्यक्ष शहा यांनी सांगितले.