scorecardresearch

कल्याण मधील बारावे कचराभूमीला भीषण आग

कल्याण येथील बारावे येथील कचराभूमीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. आधारवाडी कचराभूमी पाठोपाठ बारावे कचराभूमीला आग लागल्याने या आगींविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

Fire breaks out at twelfth garbage dump in Kalyan
कल्याण मधील बारावे कचराभूमीला आग.

कल्याण: कल्याण येथील बारावे येथील कचराभूमीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. आधारवाडी कचराभूमी पाठोपाठ बारावे कचराभूमीला आग लागल्याने या आगींविषयी संशय व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे समजताच पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली.

बारावे गाव हद्दीत पालिकेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. पालिका हद्दीत जमा होणारा बहुतांशी कचरा या भागात आणून टाकला जातो. कडक उन्हामुळे सध्या कचरा तप्त होत आहे. कचरा सुकला की पालिकेकडून त्याच्यावर सपाटीकरणाची प्रक्रिया केली जाते. तत्पूर्वीच शुक्रवारी पहाटे बारावे कचराभूमीला आग लागली. कचरा वाळून कोळ झाला असल्याने त्याने क्षणार्धात पेट घेतला. आगीने रौद्ररुप धारण केले. परिसरातील गृहप्रकल्पातील रहिवासी धूर पसरल्याने जागे झाले. अनेक रहिवासी या भागात सकाळी फिरण्यासाठी येतात. त्यांची धूर पसरल्याने कोंडी झाली.

हेही वाचा >>> येऊर बेकायदा बांधकामांचे आगार, ठाणे काँग्रेस दाखल करणार उच्च न्यायालयात जनहित याचिका

अग्निशमन दलाच्या सहा बंबांवरील जवानांनी चारही बाजुने आगीवर मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. आधारवाडी कचराभूमीला गेल्या दोन महिन्याच्या काळात तीन ते चार वेळा आगी लागल्या. आता बारावे कचराभूमीला आग लागल्याने हेतुपुरस्सर ही आग लावली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या वीस वर्षाच्या काळात आधारवाडी कचराभूमीला लागलेल्या आगी या तुरळक घटना वगळता या लावण्यात आल्या आहेत, हे महासभेतील नगरसेवकांच्या चर्चेतून पुढे आले होते. काही भंगार विक्रेत्यांना कचरा जळून गेल्यानंतर आगीतून लोखंड, तांबे, धातूसारखे घटक विक्रीसाठी मिळतात. त्यामुळेही या आगी लावल्या जात असल्याची चर्चा त्यावेळी महासभेत झाली होती. तोच प्रकार आता सुरू असल्याचे समजते. बारावे कचराभूमीला का आग लागली, याची चौकशी केली जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 16:14 IST