लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : आभासी (क्रिप्टो) चलनाच्या नावाने ठाण्यातील चार जणांची २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २० जणांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेले गुंतवणूकदार ठाण्यात वास्तव्यास आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांची ओळख जालना येथे राहणाऱ्या व्यक्तींशी झाली होती. त्यांच्याकडे आभासी चलन असून या चलनामध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १२ ते १५ टक्के परतावा मिळेल असे अमीष दाखविण्यात आले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी टप्प्या-टप्प्याने विविध बँग खात्यात २६ लाख दोन हजार ५५७ रुपये गुंतविले होते. त्यांना गुंतवणूकीस प्रवृत्त करणारे २० जण होते.

आणखी वाचा-ठाणे : टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने दुचाकी चोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांनी त्यांनी परतावा मागण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल क्रमांक बंद आला. त्यामुळे त्यांनी जालना येथे जाऊन संबंधित व्यक्तींची माहिती घेतली असता, त्यांच्याविरोधात जालना, ठाणे आणि इचलकरंजीमध्ये फस‌वणूकीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. गुंतवणूकदारांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून गुंतविलेल्या रकमेची मागणी केली. परंतु त्यांना धमकाविण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.