अंबरनाथमधील कृषी विभागाची अनोखी शक्कल

सागर नरेकर
अंबरनाथ : राज्याच्या कृषी विभागाने पीक पाहणीच्या नोंदीसाठी विकसित केलेल्या ‘ई पीक पाहणी’ अ‍ॅपवर शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कृषी विभागाने अनोखी शक्कल लढवली आहे. तालुक्यातील गावांमध्ये ज्या शेतकऱ्याच्या घरी श्रीगणेशाची स्थापना झाली आहे, त्या कुटुंबाकडे दर्शनासाठी येणाऱ्या अन्य शेतकऱ्यांना हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत या अ‍ॅपच्या वापरकर्त्यां शेतकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदणीचे काम यापूर्वी तहसिल प्रशासनाच्या मदतीने केले जात होते. या कामात वेळ आणि श्रम मोठय़ा प्रमाणावर खर्च होत असल्याने राज्य शासनाने नुकतेच ई-पीक पाहणी अ‍ॅपची निर्मिती केली. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिकाची माहिती देण्यासाठी कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने जनजागृतीही केली. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदणी शिल्लक आहे. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा त्याकामी उपयोग करण्याची योजना तालुक्यातील कृषी साहाय्यक सचित तोरवे यांनी लढवली. तोरवे यांनी सुरुवातीला अंबरनाथ तालुक्यातील चरगाव, येवे आणि िपपळोली या गावांतील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना उपक्रमाची माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे त्या शेतकऱ्यांना एक नोंदवही देण्यात आली. घरी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाइलमध्ये ई-पीक पाहणी नोंदणी झाली आहे का हे तपासून, ती झाली नसल्यास त्या नोंदणीसाठी आवाहन करण्याच्या सूचना दिल्या. ज्यांनी सूचना ऐकून मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड केले त्यांची नोंदवहीत नोंद घेण्यात आली.

गेल्या चार दिवसांत तीन गावांमधील ज्या ज्या घरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे त्या त्या ठिकाणी नोंदणी झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी या पीक पाहणी अ‍ॅपचा वापर सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गणशोत्सवाच्या निमित्ताने शेतकरीच शेतकऱ्यांना पीक पाहणी अ‍ॅपचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे.

तांत्रिक अडचणी कायम

वीज, मोबाइल नेटवर्कचा अडथळा आणि स्मार्टफोनचा अभाव ही काही कारणे या उपक्रमात अडथळा ठरत आहेत. मात्र एका मोबाइलमध्ये २० जणांची नोंदणी करता येते, त्याबाबत जनजागृतीही सुरू आहे. येवे गावात एका घरात चार दिवसांत ११६ नावांची नोंद आणि ६० शेतकऱ्यांची अ‍ॅपवर नोंदणी झाली आहे.

या उपक्रमातून ई-पीक पाहणी अ‍ॅपचा वापर वाढू लागला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अ‍ॅपचा प्रचार अधिक सोपा झाला.

– सचिन तोरवे, कृषी सहायक, अंबरनाथ.