ठाणे- जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या एक तासाच्या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे.

जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसाने हजेरी लावली नव्हती. यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता. या उकाड्याने नागरिक देखील हैराण झाले होते. परंतु, जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गुरुवारी देखील पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. यामुळे सकाळी कामाला जाणार्‍या नागरिकांची तसेच शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला. यामुळे शहरातील पेढ्या मारुती रोड, वंदना बस डेपो जवळ पाणी साचले होते. जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर तसेच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस पडत आहे.

हेही वाचा – डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय कचऱ्याचे ढीग, प्रशासनाचे दुर्लक्ष; घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णांना संसर्गाची भीती

कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षा चालकांना वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरातही पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. नाले सफाईची काम योग्य रीतीने झाली नसल्यामुळे शहराच्या अंतर्गत भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत., काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. कल्याण शहरात शिवाजी चौक, खडकपाडा, गांधारी, टिटवाळा आणि २७ गावातील अनेक भागात पाणी साचले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत देवीचापाडा येथे खारफुटीवर मातीचा भराव, शासनाने घेतली गंभीर दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंबरनाथ, बदलापुरात संततधार पाऊस

अंबरनाथ, बदलापूरसह आसपासच्या भागात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझीम असलेल्या पावसाने अर्धा तासात जोर धरला. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला. कल्याण बदलापूर रस्त्यावर सकाळी पाणी साचले नसले तरी वाहतूक संथगतीने सुरू होती. मात्र धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने नागरिकांत समाधानेच वातावरण आहे.