Manoj Jarange Patil Mumbai Protest: ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला असून, रेल्वे स्थानकांवर आणि रस्त्यांवर गर्दीचे प्रमाण वाढले आहे. तसेच आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्यातच सोमवार सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अनेक नोकरदारांनी सोमवारी वर्क फ्रॉम होम (Work From Home) चा पर्याय निवडला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनास्थळी राजकीय नेते उपस्थिती लावून जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. त्यामुळे आझाद मैदान आणि परिसर आंदोलकांच्या गर्दीने गजबजलेला आहे.

आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जरांगे यांनी आंदोलकांना आवाहन केले असून त्यांनी म्हटले आहे की, ” तुम्ही गोंधळ घातला तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. इथे कोणीही येऊ द्या, भाजपाचा नेता किंवा आणखी कुठल्या पक्षाचा नेता, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा किंवा इतर पक्षाचा नेता इथे आल्यावर त्याला सन्मानाने वागवा.”

शांतता राखण्याचे तसेच, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे तसेच ठाणे पल्ल्याडच्या भागातील अनेक नागरिक सीएसटी परिसरात कामासाठी दररोज प्रवास करतात. मात्र आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला असून, रेल्वे स्थानकांवर आणि रस्त्यांवर गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सोमवार सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. या कारणांमुळे अनेक कामगारांनी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात राहणारे सुव्रत बेडेकर हे मुंबईतील सीएसटी भागात काम करतात. त्यांनी सांगितले, “मराठा आंदोलकांची गर्दी, तणावाचं वातावरण आणि मुसळधार पाऊस या कारणांमुळे वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे.”