कल्याण – कल्याण, डोंबिवली परिसरात शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू झाला आहे. सततच्या पावसामुळे रस्तोरस्ती सखल भागात पाणी साचले आहे. बाजारपेठा, रस्त्यांवर शुकशुकाट असे चित्र आहे.

सकाळी आठ ते दहा वाजण्याच्या दरम्यान कोरडे वातावरण होते. सुर्याने दर्शन दिले होते. पावसाचे वातावरण नसल्याने अनेक नागरिक छत्री न घेताच घराबाहेर पडले होते. पण साडे दहा वाजल्यानंतर आकाशात काळे ढग वाहू लागले. आणि बघता बघता पावसाने सुरूवात केली. सकाळी अकरा पासून मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानंतर पावसाची संततधार सुरू होती.

कधी मुसळधार तर कधी संततधार अशा प्रमाणात पाऊस कोसळत आहे. संततधारेमुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची मंडप उभारणीची कामे पावसामुळे खोळंबली आहेत. काही ठिकाणी संततधार पावसाने नवरात्रोत्सवांचे मंडप पावसाने झिरपू लागले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली असल्याचे चित्र आहे.

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर, आणि शहरांतर्गत बाजारपेठांमध्ये विक्रेते इमारती, निवाऱ्यांचा आडोसा घेऊन विक्री व्यवसाय करत आहे. नवरात्रोत्सव उंबरवठ्यावर आला आहे. खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. आणि पाऊस कमी होत नसल्याने सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर मखरामध्ये देवीची मूर्ती कधी आणायची असे प्रश्न मंडळ कार्यकर्त्यांना सतावत आहेत.

संततधार पाऊस सुरू असल्याने पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. ज्या सखल भागात पाणी साचले आहे. तेथील पाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रभाग साहाय्यक आयुक्त आपल्या पथकासह प्रभागाच्या विविध भागात फिरत आहेत. रिक्षा वाहनतळांवरील रिक्षांची संख्या रोडावली आहे. मुसळधार पाऊस सुरू असला की खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरते. या पाण्यात सतत रिक्षा आपटून रिक्षा बंद पडण्याचा धोका असतो. त्यामुळे बहुतांशी रिक्षा चालकांनी प्रवाशांचा विचार न करता मुसळधार पाऊस सुरू झाल्याने दुपारनंतर घरी जाणे पसंत केले.

संततधारेमुळे विद्यार्थी, पालक विद्यार्थ्यांची दप्तरे सांभाळायची की छत्री धरायची यामुळे त्रस्त आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांच्या अनेक भागात काँँक्रीट रस्ते कामे सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेत श्रीधर म्हात्रे चौकात खडी, काँक्रीट टाकण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. हे काम पावसामुळे ठप्प झाले आहे. डोंबिवली पश्चिम महाराष्ट्रनगरमधील काँक्रीटचा रस्ता मागील काही महिन्यांपासून रखडला आहे. गणेशोत्सव संपून नवरात्रोत्सव सुरू झाला तरी ठेकेदार हे काम पूर्ण करत नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.