साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारपाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे शहराच्या तुलनेत इतर शहरांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होता. जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचल्याने त्याचा शहरातील वाहतूकीवर परिणाम होऊन कोंडी झाली. काल्हेर-कशेळी मार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत भाग, कल्याण- बदलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना अवघे १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण तासाचा अवधी लागत होता. त्यामुळे सांयकाळी शाळेतून घरी परतणारे विद्यार्थी, कामावरून घरी परतणारे वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले. ठाणे शहरातील आंबेडकर रोड येथील सातमजली इमारतीचा सज्जा कोसळला तर तीन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागात दिवसभर पाऊस सुरु होता. जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे पावसामुळे वाहतूकीचा वेगही मंदावला होता. त्यामुळे काल्हेर-कशेळी मार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत भाग, कल्याण- बदलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. काल्हेर-कशेळी मोठ्याप्रमाणात खड्डे पडलेले असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. या कोंडीमुळे वाहन चालकांना अवघे १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण तासाचा अवधी लागत होता. त्यामुळे सांयकाळी शाळेतून घरी परतणारे विद्यार्थी, कामावरून घरी परतणारे वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले.

ठाणे शहरात पावसाचा जोर जास्त होता तर, त्या तुलनेत इतर शहरात मात्र पावसाचा जोर कमी होता. ठाणे शहरातील तलावपाली, वदंना सिनेमागृह, तीन पेट्रोल पंप, घंटाळी रोडसह मुंब्रा तसेच दिव्यातील काही भागात पाणी साचले होते. पाचपाखाडी येथील भक्ती मंदिर, लुईसवाडी, ब्रम्हांड येथील स्वस्तिक पार्क, कासारवडवली गाव, मनोरुग्णालय परिसर अशा अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. पाचपाखाडी, कामगार रुग्णालय परिसरात तीन वृक्ष उन्मळून पडले होते. तसेच आंबेडकर रोड येथील एका इमारतीचा सज्जा कोसळला होता. वर्तकनगर येथील म्हाडा काॅलनी परिसरात संरक्षण भिंत पडली होती. चंदनवाडी येथील रायगड गल्ली भागात १० फूट उंच भिंत कोसळली. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नाही. कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागातही पावसाची संततधार सुरू होती. या भागातील कल्याण-बदलापूर मार्गावर पाणी साचल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.