गणेशोत्सवानंतर अंमलबजावणी, कोंडीवर उपाय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शिळफाटा-महापे मार्गावर अवजड वाहनांना प्रायोगिक तत्त्वावर ३० दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. गणेशोत्सवानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

आता तळोजा-शिळफाटा या मार्गावरूनच अवजड वाहतूक सुरू राहणार असून या वाहतुकीसाठी दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे महापे तसेच शिळफाटा मार्गावरील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

शिळफाटा मार्गावरून दररोज मुंबई, नाशिक, गुजरात आणि जेएनपीटी बंदराच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्या मोठी आहे. याशिवाय, शिळफाटा परिसरात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली असून यामुळे या भागाचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण  झाले आहे. या भागांतील रहिवाशांच्या वाहनांचा भारही शिळफाटा मार्गावर वाढला आहे. त्यापैकी बहुतांश नागरिक नवी मुंबई तसेच मुंबई परिसरात नोकरी करीत असून ते कामावर जाण्यासाठी महापे मार्गावरून प्रवास करतात. तसेच कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकही याच मार्गावरून प्रवास करतात. या मार्गावरून अवज़्‍ाड वाहनांची वाहतूक सतत सुरू असते. मुंब्रा बाह्य़वळणमार्गे जेएनपीटीच्या दिशेने जाणारी अवजड वाहने शिळफाटा चौकातून वळण घेऊन महापेमार्गे जातात. तसेच जेएनपीटी बंदरातून याच मार्गे मुंब्रा बाह्य़वळणमार्गे वाहतूक सुरू असते. या वाहतुकीसाठी शिळफाटा चौकातील वाहतूक काही काळ रोखून धरण्यात येते. त्यामुळे तळोजा, मुंब्रा, कल्याण आणि महापे मार्गावर वाहनांच्या रांगा लागून प्रचंड कोंडी होते. या कोंडीमध्ये नोकरदार वर्गाची वाहने अडकून पडतात.

या नित्याच्या कोंडीमुळे नोकरदारवर्ग हैराण झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या वाहतूक कोंडी मालिकेतून या भागातील समस्या मांडण्यात आली होती. त्याची दखल घेत ही कोंडी सोडविण्यासाठीची अधिसूचना ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढली आहे.

मुंब्रा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सुरेश लंभाटे यांनी सांगितले की, महापे मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घातल्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. याशिवाय, मुंब्रा, कल्याण आणि शिळफाटा चौकातील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. गणेशोत्सवानंतर हे बदल लागू केले जाणार असून त्यासाठी जागोजागी वाहतूक बदलासंबंधीचे फलक लावले जाणार आहेत.

बदल कोणते?

’आता ठाणे आणि घोडबंदर प्रमाणेच शिळफाटा भागात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत प्रवेश.

’शिळफाटा-महापे मार्गे अवजड वाहतुकीला प्रवेश बंदी मात्र, दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांची वाहतूक सुरू राहील.

’मुंब्रा बाह्य़वळण मार्गे येणारी अवजड वाहतूक शिळफाटा- कल्याणफाटा- दहीसर मोरी-तळोजा मार्गे दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत सोडली जाईल

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy vehicle ban on shilphata mahape route zws
First published on: 10-09-2019 at 02:30 IST