पाच महिन्यांच्या कालावधीत ३०९० घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट

ठाणे: केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत घरकुल योजनेचा दुसरा टप्पा महा-आवास अभियान ग्रामीण २०२१-२२ हे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत जिल्ह्यत राबविण्यात येत आहे. महा आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यत केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनेद्वारे १० हजार १९८ घरकुले मंजूर करण्यात आली होती. यापैकी ९ हजार ४४० घरकुलांची उभारणी झाली असून ७५८ घरकुलांचे काम अद्याप अपूर्ण आहे.

या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात नव्याने एकूण ३ हजार ९० घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला पुढील पाच महिन्यांमध्ये अपूर्ण आणि नव्याने मंजुर केलेले असे एकूण ३ हजार ८४८ घरकुलांची उभारणी करावी लागणार आहे.

जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या महा आवास अभियान टप्पा २ अंतर्गत ठाणे जिल्हास्तरीय कार्यशाळेच नुकतेच जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. देशपातळीवर सामाजिक आणि आर्थिक निकषांना केंद्रस्थानी ठेऊन एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या घटकांना घरकुलांची आवश्यकता असणाऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली. या सर्व कुटुंबांना प्राधान्याने घरे देण्याचा निर्णय केंद्र शासनातर्फे घेण्यात आला होता. या योजनेच्या लाभार्थी कुटुंबे निश्चित करून त्यांना घरकुल उभारण्यासाठी १ लाख २० हजार रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

लाभार्थी कुटुंबाने स्वत:ने या योजनेत घर उभारणे अपेक्षित आहे. घरकुल बांधण्याच्या प्रक्रियेत कामाच्या प्रगतीनुसार लाभार्थ्यांना पैसे दिले जातात. ग्रामीण विभागात नेमलेले गृहनिर्माण अभियंताद्वारे घरकुलांच्या कामाची पाहणी केली जाते. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे ६ हजार ७०८ घरकुलांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी ४८० घरकुले अपूर्ण आहेत. तर मोहिमेच्या दुसरम्य़ा टप्प्यात २,६१५ घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. असे एकूण ३ हजार ९५ घरकुले पुर्ण करायची आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्यतिरिक्त रमाई, शबरी, आदिम पारधी आवास योजना,दीनदयाळ घरकुल खरेदी अर्थसहाय्य योजना या राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३ हजार ४९० घरकुले मंजूर करण्यात आली होती. यापैकी २७८ घरकुलांचे काम अपूर्ण आहेत. या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यत नव्याने ४७५ घरकुले बांधायची आहेत. असे एकूण ७५३ घरकुलांचे उद्दिष्ट मोहिमेच्या या दुसऱ्या टप्प्यात पूर्ण केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.