कल्याण- कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील संपदा रुग्णालया जवळील दोन बंद घरांच्या दरवाजांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी चार लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज शनिवारी चोरुन नेला. यामध्ये एका वकिलाच्या घराचा समावेश आहे. कल्याण मधील चिकणघर हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या परिसरात चोऱट्यांचा वावर वाढल्याने परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत. पोलिसांनी सांगितले, चिकणघर येथील संपदा रुग्णालया जवळ विघ्नहर सोसायटी आहे. या सोसायटीच्या तळ मजल्याला ॲड. प्रदीप राठोड राहतात. या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर अभय सिंग यांचे घर आहे.

ॲड. राठोड हे शनिवारी सकाळी अकरा वाजता आपल्या न्यायालयीन विषयक कामासाठी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात गेले. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कुलुप कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील दोन लाख ८५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. संध्याकाळी घरी आल्यानंतर ॲड. राठोड यांना घरात चोरी झाल्याचे समजले. सोसायटीत चोरी झाल्याचे समजल्यावर सर्व रहिवासी जागृत झाले. यावेळी सोसायटीतील तिसऱ्या माळ्यावर अभय सिंग यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले. अभय यांच्या घराचा कडी कोयंडी तोडून घरातील ९५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. एकाच चोऱट्याने पाळत ठेऊन या चोऱ्या केल्या असण्याचा संशय पोलिसांना आहे. दोन्ही चोऱ्यांमध्ये सोने, चांदीचा ऐवज, रोख रकमेचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲड. प्रदीप राठोड यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.