डोंबिवली – बेकायदा बांधकामांमुळे शहराचे नियोजन बिघडले आहे. अनेक नागरी समस्या या बेकायदा बांधकामांनी शहरात निर्माण केल्या आहेत. पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादने ही बांधकामे होत आहेत. अशा बांधकामांबरोबर शहरात सुरू असलेल्या काही बेकायदा धर्मस्थळांना अधिकारी पाठीशी घालत आहेत. असा आरोप करत गेल्या तीन वर्षांपासून (९०० दिवस) पालिकेच्या विरोधात आंदोलन करणारे निर्भय बनो संस्थेचे संस्थापक महेश निंबाळकर यांनी आज पुन्हा मानपाडा रस्त्यावरील धर्मस्थळाबाहेर जाऊन भीक मागो आंदोलन केले.

पोलिसांची परवानगी घेऊन हे आंदोलन करण्यात आले. मागील तीन वर्षांपासून बांधकामे घटनास्थळी, ऑनलाइन मार्गातून निंबाळकर यांनी बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध आंदोलन सुरू ठेवले आहे. या बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध न्यायालयात जाऊन लढण्याची आपली ताकद नाही. राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण हे आंदोलन करत आहोत, असे निर्भय बनो मंचचे निंबाळकर यांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणमधील काळा तलाव येथे अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण

डोंबिवली, कल्याणमध्ये कधी नव्हे एवढी बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. प्रभागातील साहाय्यक आयुक्त या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होतात. तक्रार आली की त्या इमारतीवर जुजुबी कारवाई करून त्या इमारतीला अभय देतात. तोडलेल्या त्या इमारती पुन्हा नव्याने उभ्या केल्या जातात. अशा इमारती रहिवासासाठी धोक्याच्या असूनही पालिका अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, असे निंबाळकर म्हणाले.

व्हिडीओ – लोकसत्ता टीम

मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा समोरील एका धर्मस्थळासमोर निर्भय बनोतर्फे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. भूमाफियांबरोबर आर्थिक व्यवहार करून पालिका अधिकारी बेकायदा बांधकामांची पाठराखण करतात. अशा अधिकाऱ्यांना नागरिकांकडून भीक मागून मिळालेले पैसे समान वाटप करून वाटावेत म्हणून महेश निंबाळकर यांनी शहरातील रस्त्यावर धोतर नेसून भीक मागो आंदोलन केले. शहरातील नागरिकांनी त्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. त्यांच्या हातामधील थाळीत नाणी, नोटा टाकून नागरिक हे पैसे पालिका अधिकाऱ्यांना पोहोचवा, असे सांगत होते. गेल्या तीन वर्षांच्या काळात फ प्रभाग कार्यालयात त्यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले होते. ९०० दिवस उपोषण सुरू असूनही शासन अधिकारी कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

डोंबिवली, कल्याण शहरात आजघडीला सुमारे २०० हून अधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. सर्वाधिक बेकायदा बांधकामे डोंबिवलीतील ह प्रभाग, ग प्रभाग हद्दीत सुरू आहेत. ह प्रभाग हद्दीतील कुंभारखाणापाडा येथील हरितपट्टावरील सिद्धेश कीर, प्रफुल्ल गोरे, सिकंदर नंदयाल, कुलदीप चोप्रा, मनोज भोईर, काळुबाई मंदिराजवळील मुकेश आणि जितू म्हात्रे, बाळकृष्ण बाजारजवळ एक पालिका अधिकाऱ्याने उभारलेले बेकायदा बांधकाम, ग प्रभागातील १४ बेकायदा बांधकामे सर्वाधिक चर्चेत आहेत.

हेही वाचा – कल्याण रेल्वे स्थानकात फलाटावरील पेव्हर ब्लॉक निघाल्याने प्रवाशांची घसरगुंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“डोंबिवली, कल्याणमधील बेकायदा बांधकामे जोपर्यंत भुईसपाट केली जात नाहीत. या बांधकामांना जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन ९०० दिवसच काय नऊ हजार दिवस पण सुरूच राहणार आहे. सत्यमेव जयतेप्रमाणे एक दिवस नक्कीच आपला विजय होईल. सर्व बेकायदा बांधकामे भुईसपाट होतील.” – महेश निंबाळकर, निर्भय बनो मंच, डोंबिवली.