कल्याण : कल्याण जवळील कल्याण- मुरबाड रस्त्यावरील वरप गाव हद्दीत एका उच्चभ्रू अलिशान सोसायटीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने धारदार शस्त्राने पत्नीची गुरूवारी हत्या केली. पत्नीला ठार मारल्यानंतर पतीने स्वतावर धारदार शस्त्राने वार करून करून आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर उल्हासनगर येथील मध्यवर्ति रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विद्या संतोष पोहळ (४०) असे मृत पत्नीचे नाव आहे. संतोष पोहळ (४१) असे मारेकरी पतीचे नाव आहे. हे जोडपे टिटवाळा पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण मुरबाड रस्त्यावरील वरप गावातील विश्वजित प्रीअर्स या अलिशान सोसायटीत आपल्या दोन मुलांसह राहत होते. संतोष हा चालक आहे. त्याची पत्नी विद्या मुंबईमध्ये टाटा मोटर्समध्ये नोकरी करत होती. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मागील काही दिवसांपासून संतोष पोहळ हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यांच्यात या विषयावरून सतत वाद सुरू होते. पत्नी विद्या पतीचे आरोप फेटाळून लावत होती. पती तिला चारित्र्याच्या संशयावरून सतत त्रास देत होता.
पत्नी विद्या हिच्या चारित्र्याच्या विषयावरून गुरूवारी रात्री पत्नी आणि पतीमध्ये जोराचे भांडण सुरू झाले. या वादाचे पर्यावसन हाणामारी आणि नंतर रागाच्या भरात संतोष पोहळ याने घरातील धारदार चाकूने पत्नी विद्यावर शिवीगाळ करत सपासप वार केले. विद्याने स्वताला वाचविण्याचा प्रयत्न केला. एकटीच असल्याने ती बचावात कमी पडली. त्याचा गैरफायदा घेत संतोषने तिला जागीच ठार मारले. पत्नी मृत्युमुखी पडताच संतोषने स्वतावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. या घटनेने वरप, म्हारळ परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी, म्हारळ पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी दत्तात्रय नलावडे आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. या प्रकरणाची पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली तेव्हा त्यांना वैवाहिक वाद आणि पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आले. विश्वजित प्रीअर्स या उच्चभ्रंच्या सोसायटीत हा प्रकार घडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अशाच पध्दतीने यापूर्वी टिटवाळा भागात गेल्या दोन वर्षात दोन ते तीन प्रकरणे घडली आहेत.
