बदलापूर: बदलापूर गावातील आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर बोराडपाडा रस्त्यावर गुरुवारी झालेल्या गोळीबार प्रकरणात जखमी असलेल्या फिर्यादी अल्ताफ शेख याने या हल्ल्यात जगदीश कुडेकर यांचे नाव घेतले आहे. जगदीश कुडेकर हे शिवसेना शिंदे गटाचे बदलापूर उपशहर प्रमुख असून या गोळीबार प्रकरणात त्यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यातील फिर्यादी आणि आरोपी दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
गुरुवारी अल्ताफ शेख याच्यावर पाच ते सहा जणांच्या टोळीने गोळ्या झाडल्या. या प्रकरणात जखमी फिर्यादी अल्ताफ शेख याने दिलेल्या तक्रारीनंतर विवेक नायडू, उदय झुठे, शेखर गडदे, सोहम मेस्त्री आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र अल्ताफ शेख याने या गोळीबाराचा सूत्रधार शिवसेनेच्या शिंदे गटाचा बदलापूर उपशहर प्रमुख जगदीश कुडेकर असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे याप्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे गोळीबाराच्या दिवशी जगदीश कुडेकर हे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणानंतर कुडेकर यांची प्राथमिक चौकशी केली आहे.
याबाबत फिर्यादीने काही माहिती दिल्यास आणि तांत्रिक तपासात आणखी काही आरोपी आढळल्यास त्यांचा आरोपी म्हणून समावेश केला जाईल, अशी माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
फिर्यादीने केलेल्या आरोपांबाबत जगदीश कुडेकर यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध नाही, असे सांगत त्यांनी फिर्यादीचे आरोप फेटाळले. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी मी माझी एक तक्रार घेऊन पोलीस ठाण्यातच बसलो होतो. पोलिसांनी चौकशी करावी. मी त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी असे आरोप केले जात असावेत, असेही कुडेकर लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.