बदलापूरः गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर शहरात रंगलेल्या आमदार किसन कथोरे विरूद्ध वामन म्हात्रे वादाचे पर्यावसन आता भाजप विरूद्ध म्हात्रे बंधू असे झाल्याचे दिसून आले आहे. बदलापूर शहर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांच्या कार्यक्रमाप्रसंगी भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने वामन म्हात्रे यांच्यावर टीका करत असतानाच स्वपक्षिय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पक्ष बांधिलकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचवेळी आमदार कथोरे यांनीही आमदार म्हात्रेंबाबत सवाल उपस्थित केला. या वक्तव्यानंतर बदलापूर भाजप म्हात्रे बंधूंविरूद्ध उतरल्याचे चित्र होते. समाज माध्यमांवर वामन म्हात्रे यांनी याबाबत उत्तर दिले. मात्र शहरात भाजप विरूद्ध म्हात्रे बंधू असे चित्र दिसते आहे.
बदलापुरात भाजपने नुकतीच खांदेपालट केली. शहराध्यक्षांच्या नेमणुकीत नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवली आहे. त्याचा सोहळा नुकताच पार पडला. मात्र या नेमणुकांपेक्षा शहरातील वामन म्हात्रे आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यां म्हात्रे बंधूंवरील टीकेमुळेच हा कार्यक्रम अधिक चर्चेत आला. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी शिवसेनेनेे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्यासोबत गद्दारी केली असे वक्तव्य केले. तसेच यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाचे मात्र शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे बंधू शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याबद्दल वक्तव्य केले. ते नेमके भाजप पक्षाचे आमदार आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या पत्रावरून भाजप कार्यकर्त्यांना विकासकामे करण्याची संधी मिळत नाही, असे घोरपडे म्हणाले होते. याच वक्तव्याची री स्थानिक आमदार किसन कथोरे यांनीही ओढली. भाजप बैठकीतल्या या वक्तव्यांमुळे बदलापुरातील राजकारण ढवळून निघाले.
ज्ञानेश्वर म्हात्रे हे भाजपचे आमदार आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपने त्यांना संधी दिली. त्यापूर्वी ते शिवसेना पक्षातून सक्रीय होते. त्यांचे बंधू हे शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख आहेत. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. विधानसभा निवडणुकीपासून वामन म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. दोघेही एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. पालिकेतील कामांच्या माध्यमातून कथोरे यांनी म्हात्रे यांच्यावर हल्ला चढवला होता. तर सोनिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या निर्मितीवरून म्हात्रे यांनी कथोरेंवर टीका केली होती. कथोरे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले होते.
नुकत्याच झालेल्या टीकेवर वामन म्हात्रे यांच्या फेसबुक खात्यावरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आमदार कथोरेंना पाडण्यासाठी टीका करणारेच प्रयत्नशील होते. एका शेतघरात भाजपच्या कोणत्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी पैसे घेतले हेही घोरपडे यांनी जाहीर करावे असेही आवाहन म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना दिले. तसेच शिवसेनेवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे अन्यथा आमच्याकडेही बरेच बोलण्यासारखे आहे, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला. तर मला स्थानिक राजकारणात ओढू नका, याबाबत वरिष्ठांशी बोलेल अशी प्रतिक्रिया शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे.
या वादानंतर शहरातील दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते समाज माध्यमांवर एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. मात्र भाजप विरूद्ध म्हात्रे बंधू असे चित्र सध्या बदलापुरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळते आहे.