डोंबिवली : शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे मंगळवारी मंगळागौर स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहराच्या काही भागात या मंगळागौर स्पर्धेचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु या स्पर्धेच्या फलकावर मंगळागौर ऐवजी ‘मंगळगौर’ अशी चूक असताना, त्यामध्ये काही बदल न करता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हा फलक लावण्यास अनुमती दिल्याने शहरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारतीय सण, उत्सवांची जाहीर ठिकाणी नावे झळकवताना ते तपासून घ्यावेत. किमान त्याचे पावित्र्य, महतीची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी डोंबिवलीतील नागरिकांकडून केली जात आहे. या फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांची छबी आहे. आपल्या नेत्यांची नावे जेथे झळकतात तेथे काही चूक झाली आहे, याचेही भान कार्यकर्त्यांना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या स्पर्धेपेक्षा ‘मंगळगौर’ या शब्दाचीच चर्चा अधिक प्रमाणात नागरिकांमध्ये सुरू आहे. डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील सर्वेश सभागृहाच्या कोपऱ्यावर शिवसेनेने मंगळागौर स्पर्धेचा फलक लावला आहे. त्या फलकावर ठळक अक्षरात मंगळगौर शब्द लिहिला असताना शिवसेना महिला, पुरूष पदाधिकाऱ्यांच्या ही चूक निदर्शनास कशी आली नाही, असा चर्चेचा सूर आहे.

हेही वाचा : ठाण्यात शरद पवार गटाने भुजबळांचा तर, अजित पवार गटाने आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

मराठी बाणा, मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही असलेल्या शिवसेनेला आपण लावत असलेल्या फलकावर मराठी नावात चूक होत आहे याचे थोडेही भान नसावे याविषयी डोंबिवलीतील सुजाण नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर हा फलक लावल्याने रिक्षा, चारचाकी वाहनांमधील प्रवाशांमध्ये मंगळगौर शब्दाचीच चर्चा आहे.

मंगळवारी संध्याकाळी चार वाजता सावित्रीबाई नाट्यगृहात शिवसेनेतर्फे मंगळगौरी स्पर्धेचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, आ. मनीषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना कल्याण जिल्हा संघटक लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे. फलक तयार झाल्यानंतर तो पक्षातील प्रमुख, कार्यालयातील मंडळी नजरेखाली घालतात. मग तो प्रसिध्दीसाठी अनुमती दिली जातो. शिवसेना शहर कार्यालयातून या फलकाची तपासणी न करताच तो लावला का?, असा प्रश्न जाणकार नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयासमोरील सततच्या कोंडीने प्रवासी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, स्पर्धा फलक तयार करण्याची मंजुरी दिल्यानंतर फलक नेहमीप्रमाणे तयार करुन तो लावला जाईल असे वाटले. आम्ही जाहिरातीचे मूळ प्रारुप योग्यरितीने दिले होते. फलकावर छपाई करताना चूक झाल्याने हा गोंधळ झाला. तो दुरुस्त केला जाईल.