कल्याण : माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान यांच्यावर हल्ला करणाऱ्या एका बडतर्फ शिक्षकासह त्याच्या साथीदाराला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. उर्वरित तीन फरार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. प्रधान यांनी रविवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मारहाण, घुसघोरी, डांबून ठेवणे या कायद्याने आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला होता. माजी कुलगुरूंना मारहाण झाल्याचे पडसाद राज्यभर उमटले. शिक्षण क्षेत्रातील अनेक मंडळींनी या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका शासनस्तरावर घेतली. या घटनेनंतर मंगळवारी पोलिसांनी प्रधान यांचा जबाब नोंदवून घेतला.

प्रधान यांच्या घरातील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांकडून तपासण्यात आले. त्यात प्रधान यांना बनावट पिस्तूलचा धाक दाखविणे, त्यांच्या पत्नीला फरफटत नेणे, त्यांना बांधून ठेवणे, पैशाची मागणी करणे असे प्रकार कैद झाले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींवर नव्याने कलमे लावली आहेत. ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, प्रधान यांना झालेल्या मारहाण प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पोलिसांकडे केली आहे.

हेही वाचा : ठाणे : उधारीचे पैसे देत नाही म्हणून भर रस्त्यात मुलाला नग्न करून मारहाण

शिक्षणक्षेत्रात योगदान असणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्वावर हल्ला झाल्याने, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाला जबाबदार धरून ठाणे पोलीस आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या निवेदनाचा प्रत देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातील एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्वावर हल्ला होतो, हे स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे आणि पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे उदाहरण आहे, अशी टिकाही त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रा. प्रधान यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पुरवणी जबाब नोंदविण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.” – शैलेश साळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महात्मा फुले पोलीस ठाणे.