डोंबिवली – डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीतील तलावाजवळ सार्वजनिक रस्त्यावर फिरणाऱ्या एका विदेशी नागरिकाकडून मानपाडा पोलिसांनी दोन कोटी १२ लाखाहून अधिक किमतीचे मेफेड्रॉन (एम. डी. पावडर) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत पलावा, निळजे परिसरात कोट्यवधी रूपयांचे अंमली पदार्थ दुसऱ्यांदा जप्त करण्यात आल्याने या भागातून अंमली पदार्थांची उलाढाल करण्यासाठी या भागात तस्करांचा एक मोठा तळ असण्याचा संशय पोलिसांना आहे.

उच्चमध्यवर्गिय वस्तीत खासगी सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त असतो. नोकरदार, व्यावसायिक आपल्या कामात मग्न असतात. अशा परिस्थितीत मध्यमवर्गिय वस्ती भागात नागरिकांची वर्दळ कमी असल्याने अंमली पदार्थ तस्कर अशी निर्जन ठिकाणे अंमली पदार्थांच्या उलाढालीसाठी निश्चित करत असावेत, असा पोलिसांना संशय आहे.

निळजे गावाजवळ पकडलेला विदेशी नागरिक इसा बकायोका (३७) हा आयव्हरी कॉस्ट देशाचा नागरिक आहे. त्याच्याकडून मानपाडा पोलिसांनी एक किलो ५१ ग्रॅम वजनाचे सुमारे दोन कोटीहून अधिक रकमेचे मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला आहे. निळजे गावाजवळील तलावाजवळ सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान एक इसम एमडी पावडरची विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी गुप्त माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना मिळाली होती.

पोलिसांनी निळजे तलाव परिसरात सापळा लावला होता. ठरल्या वेळेत एक विदेशी नागरिक या भागात संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसला. हाच तो इसम असण्याचा अंदाज बांधून पोलिसांनी त्याला रोखले. त्याची झडती घेतली. त्याच्याजवळ दोन कोटीचे अंमली पदार्थ आढळून आले. त्याच्या विरूध्द गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला अटक करण्यात आली आहे.

गेल्या दहा दिवसापूर्वी खोणी पलावा वसाहतीमधील डाऊन टाऊन गृहसंकुलात छापा मारून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांचा मुख्य म्होरक्या फरहान उर्फ मोहम्मद शेखला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. असिल सुर्वे, मोहम्मद कुरेशी, मेहेर देवजानी यांनाही याप्रकरणात घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे. फरहानची बंगलोर येथील चोरीची गाडी एमडी पावडरसह पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सव्वा दोन कोटी किमतीची एमडी पावडर जप्त केली आहे. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणाचा नवी मुंबई भागात तपास करताना पोलिसांनी विदेशी नागरिक इसाची माहिती मिळाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही प्रकरणातून अंमली पदार्थांची तस्करी करणारी एक मोठी आंतरराष्ट्रीय तस्करांची टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांना आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस अधिकारी दत्तात्रय गुंड, सागर चव्हाण, अजय कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.