ठाणे : एकीकडे सोन्याच्या दरात वाढ होत असली तरी शहरातील सराफांच्या दुकानांत अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर शहरातील सराफांच्या दुकानांत सोने खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी होत असल्याचे पहायला मिळाले. या मुहूर्तावर बुधवारी सोने खरेदी करता यावे यासाठी ७० ते ८० टक्के ग्राहकांनी सराफ पेढींवर आगाऊ नोंदणी केली होती असे एका सराफाने सांगितले. त्याचप्रमाणे पुजेसाठी लागणारे साहित्य तसेच फुलांना देखील चांगली मागणी असल्याचे दिसून आले.

शहरातील स्थानक परिसर बाजारपेठ, जांभळी नाका, नौपाडा, राम मारूती रोड या बाजारपेठा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फुलल्या होत्या. सध्या सोन्याच्या दरात वाढ होत असली तरी शहरातील सराफांच्या दुकानांत मात्र सोने खरेदीसाठी आगावू नोंदणी करण्यात आली होती. सध्या ९५ हजाराने सोने तर ९९ हजाराने चांदी दर आहेत.

गुढीपाडव्या नंतर सोेन्याच्या दरात वाढ झाली असली तरी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी केले जात असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे घराघरांत होणाऱ्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांत सकाळपासून गर्दी झाली होती. तसेच पूजनासाठी विविध प्रकारची फुले, हार-गजरे घेण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी लक्षणीय होती.

शहरातील फुल बाजारात सणानिमित्त फुलांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आधी ४० ते ५० रूपये किलोने फुले विकली जात होती. तिच फुले आता सणानिमित्ताने ८० रूपये किलोने विक्री होत आहेत. यामध्ये अवघे ३ ते ४ चार दिवसांसाठी फुलांच्या दरात दुपटीने वाढ केल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे शेवंती या फुलाची आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने शेवंती १५० रूपये किलोने विकली जात असल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले. तसेच वाढते तापमान पाहता इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींना मोठी मागणी होती.

इलेक्ट्रॉनिक या दुकानांमध्ये देखील वस्तूंची पुर्व नोंदणी करण्यात आली होती त्यामुळे शुभ मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. या दुकानांतील विक्रेत्यांनी देखिल वस्तूंवर सणानिमित्त विविध सवलती ठेवल्या होत्या. तसेच या सणाला फळांमध्ये आंब्याला सर्वाधिक महत्त्व असते. त्यामुळे ठाणे शहरातील बाजारात आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. दरवर्षी हापूस आंब्याना मागणी असते. परंतु, यंदा ठाण्यात हापूस सोबतच बदाम आणि केसर आंब्यांनादेखील मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

अक्षय्य तृतीया हे सोने खरेदीचे पर्व असले, तरी देवपूजेसाठी फुलांची खरेदीही तितकीच महत्त्वाची मानली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी वाहन खरेदी देखील अधिकप्रमाणात केली जाते. त्यामुळे दोन दिवसआधीपासूनच ग्राहकांची फुले खरेदीसाठी गर्दी होती.- शिवम घोगरे, फुल विक्रेते

सणानिमित्त ७० ते ८० टक्के सोन्याची आगावू नोंदणी करण्यात आली होती. तसेच यंदा सोन्याची साखळी तसेच हातातील बांगड्यांना अधिक मागणी आहे. त्याचप्रमाणे या मुहूर्तावर ८० टक्के लग्नसराईसाठी काही प्रमाणात नोंदणी करण्यात आली आहे. – महेंद्र संघवी, सराफ