लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: राज्य सरकारची वर्षपूर्ती जवळ आली असून त्यानिमित्ताने ठाणे शहरात रविवारी विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमांच्या निमित्ताने शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून त्याचबरोबर शिंदे यांच्या शिवसेनेने शहरात लोकोपयोगी प्रकल्पांचा धडाका लावल्याचे चित्र आहे.

ठाणे येथील किसननगर भागातील क्लस्टर योजनेचा शुभारंभ तसेच दिवा परिसरातील विविध लोकोपयोगी प्रकल्पांचे भुमीपुजन व उदघाटनांचा बार काही दिवसांपुर्वीच उडाला. त्यापाठोपाठ आता राज्य सरकारकडून अनुदान मिळालेल्या ठाणे शहरातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून हे प्रकल्प राबविण्यात आले आहेत. या कार्यक्रमास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे प्रमुख अतिथी असणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह आमदार, खासदार उपस्थितीत राहणार आहेत.

हेही वाचा… मनोज सानेला ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळी १० वाजता पोखरण रस्ता क्रमांक. २ येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व. बाबुराव मारुतीराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर आणि महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पोखरण रस्ता क्रमांक. २ येथील कै.सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, कासारवडवली, घोडबंदर रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावरील आदिवासी विद्यार्थी वसतीगृह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजीटल ॲक्वेरियम या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ११ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मुख्य सोहळा पार पडणार आहे.