ठाणे: गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने ठाणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये भाज्यांची आवक घटली असून यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात प्रति किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात ग्राहकांकडून अव्वाचे सव्वा दर आकारुन ग्राहकांची लुट केली जात आहे. शिवाय, टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार गेले आहेत. या दर वाढीमुळे नागरिकांना महागाईची झळ बसू लागली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाशिक, नगर तसेच इतर जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मुंबई, ठाणे उपनगरात भाज्यांची आवक घटली आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ ते १० टक्क्यांनी आवक घटली आहे. दोन दिवसापूर्वी बाजार समितीत भाज्यांच्या ५५० ते ६०० गाड्या दाखल झाल्या होत्या. तर, मंगळवारी या गाड्यांच्या संख्येत घट झाली असून ४५० ते ५०० गाड्याच दाखल झाल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आवक घटल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

हेही वाचा… कल्याण येथील ज्येष्ठ पत्रकार दामुभाई ठक्कर यांचे निधन

घाऊक बाजारात प्रति किलो मागे पाच ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दोन दिवसांपूर्वी ११ रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारा दुधी भोपळा १७ रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे. ३२ रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारी फरसबी ३५ रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहे. दोन दिवसापूर्वी कारले १८ रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात येत होते. यात, ७ रुपयांची वाढ झाली असून सध्या २५ रुपये प्रति किलोने कारले विक्री करण्यात येत आहे. २० रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारी काकडी मध्ये ही प्रति किलो मागे सात रुपयांची वाढ झाली असून सध्या २७ रुपये किलोने काकडीची विक्री करण्यात येत आहे. तर, किरकोळ बाजारात ग्राहकांकडून अव्वाचे सव्वा दर आकारुन ग्राहकांची लुट केली जात आहे.

टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत १० टक्के नविन कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात ४६ रुपये प्रति किलोने कांदा विक्री करण्यात येत आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात अद्यापही कांद्याची विक्री ७० रुपये प्रति किलोने करण्यात येत आहे, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा – बटाटा मार्केटचे सहाय्यक सचिव बाळासाहेब टावरे यांनी दिली. टोमॅटोची घाऊक बाजारात प्रतिकिलो ३८ रुपयांनी विक्रि होत आहे तर, किरकोळ बाजारात मात्र प्रति किलो ७० रुपयांनी विक्री करण्यात येत आहे. दोन दिवसांपुर्वी ५० रुपयांनी टोमॅटोची विक्रि होत होती. यामुळे टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार गेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या भाज्यांचे दर (प्रति किलो रुपयांमध्ये)

भाजीघाऊककिरकोळ
दुधी भोपळा१७४०
चवळी शेंग२७६४
फरसबी३५६०
फ्लॅावर१६६०
घेवडा३३६०
कारले२५४०
कोबी१५३०
शिमला मिरची२६५०
पडवळ२९८०
दोडका२१८०
टोमॅटो३८७०
वांगी१२४०