स्वच्छता राखण्यासाठी कल्पक प्रयोग

रस्ते दुभाजकांची दयनीय अवस्था, धोकादायक स्थितीतील दुभाजक अशा मुद्यांवर वाहनचालक आणि प्रवाशांकडून नेहमीच महापालिका प्रशासनावर नेहमीच बोचरी टीका होत असते. त्यामुळे दुभाजकांना वेगळय़ा पद्धतीने सजवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वसई-विरार महापालिकेच्या नवघर-माणिकपूर प्रभाग समितीकडून त्यांच्या हद्दीतील रस्ता दुभाजकांवर वारली चित्रकलेची कलाकुसर करण्यात आली आहे. या कलाकुसरीमुळे रस्ता दुभाजक लक्षवेधी ठरला असून रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी काही काळ थांबून दुभाजकावरील वारली कलाकुसर मोठय़ा जिज्ञासेने न्याहाळत असल्याचे दिसून येत आहे.

वसई-विरार शहर महापालिकेच्या नवघर-माणिकपूर प्रभाग समितीच्या हद्दीत येणाऱ्या भाबोळा येथील साईबाबा मंदिरालगत असलेला दुभाजक दोन्ही बाजूंनी लाल रंगाने रंगवण्यात आला असून त्यावर पांढऱ्या रंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळालेली वारली चित्रकला चितारण्यात आली आहे.

एरवी गुटखा-तंबाखूच्या पिचकाऱ्याने रंगणारा हा ६० ते ७० फुटांचा दुभाजक वारली चित्रकलेमुळे अत्यंत आकर्षक आणि लक्षवेधी ठरला आहे. दुभाजकावरील ही रंगरंगोटी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘प्रशासनाने लोकांच्या सोयीकरिता रस्ते दुभाजक उभारले की अनेकजण त्यावर थुंकून तो विद्रूप करतात. त्यामुळे परिसरालाही अवकळा येते. या रस्ते दुभाजकावर आकर्षक चित्रे काढण्यात आल्यामुळे किमान आता तरी हे दुभाजक कोणी अस्वच्छ करणार नाही’, असे नवघर-माणिकपूर प्रभाग समितीचे सभापती गिल्सन गोन्सालवीस यांनी सांगितले.

विविध ठिकाणी कल्पक प्रयोग

नुकतीच वसई-विरार महापौर राष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा पार पडली. त्याआधीच या दुभाजकाची उंची वाढवून त्यावर वारली चित्रकला चितारण्यात आली. दुभाजकावर अशा प्रकारे चित्रकला करण्याची कल्पना प्रभाग समिती सभापती उमा पाटील यांची. ‘दुभाजकावरील चित्रकलेमुळे जनतेतून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. लवकरच प्रभागातील अन्य दुभाजकही अशाप्रकारे सुशोभित केले जातील. या दुभाजकांची उंची वाढवल्यामुळे रस्ता ओलांडण्याचे प्रमाण कमी झाले आहे’, असे सभापती उमा पाटील यांनी सांगितले. प्रभागात ज्या ठिकाणी अस्वच्छता केली जाते, त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही कल्पक प्रयोग करून स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना भाग पाडले जात असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.