ठाणे : क्रिकेटपट्टूंसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या वतीने मुंब्रा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी उभारण्यात येणार आहे. या अकादमीद्वारे स्थानिक तसेच ठाणे, कल्याण, अंबरनाथ परिसरातील क्रिकेटपटूंना मोफत प्रशिक्षण पुरविले जाणार आहे. ठाणे महापालिकेकडून एमसीएला पाच एकरचा भूखंड देण्यात आला असून लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. जितेंद्र आव्हाड आणि एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावतीने परिषद घेण्यात आली. या परिषदेत बोलत असताना आव्हाड यांनी क्रिकेट अकादमीबाबत माहिती सांगितली. “गेल्या २० वर्षांपासून ठाण्यात एमसीए अकादमी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर हे स्वप्न पूर्ण होत आहे. मुंब्रा येथील पाच एकरच्या भूखंडावर अकादमी उभारण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मांडला होता. आयुक्त आणि राज्य शासनाने प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर भूखंड एमसीएकडे देण्यात आला. या जागेचे भाडे ७.५ कोटी असून, रजिस्ट्रेशनसाठी ४० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. या क्रिकेट अकादमीच्या उभारणीस लवकरच प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ठाण्यासारख्या ठिकाणी क्रिकेट अकादमी उभारण्याचा आमचा मानस होता. त्यामुळे या परिसरातील क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळेल. ही अकादमी क्रिकेटपट्टूंसाठी मोफत असेल. येथे ड्रेसिंग रूम, स्विमिंग पूल, जीम, टेनीस क्रिकेटसाठी स्वतंत्र दालन अशा सर्व आंतरराष्ट्रीय सुविधा असतील. वानखेडे स्टेडियमप्रमाणेच ही वास्तू साकारली जाईल. मुंब्र्यातील यासीन शेखप्रमाणेच अनेक नवे क्रिकेटपटू येथून घडवण्याचा एमसीएचा प्रयत्न असेल असे मत एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केले.
दरम्यान, ठाणे स्पोर्ट्स क्लबचे सरचिटणीस विकास रेपाळे यांनी बोलत असताना सांगितले की, “ही अकादमी उभारल्यामुळे टेनीस क्रिकेटवर परिणाम होणार नाही. उलट ठाण्यासारख्या शहरात अशी मोठी क्रीडा क्षेत्रातील मोठी सुविधा देणारी अकादमी उभारली जाणे, ही अभिमानाची बाब आहे. आता आपल्या शहरातून नवे खेळाडू तयार होणार, याचा आनंद आहे.