ठाणे – शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी आठ महिन्यानंतर झालेल्या बैठकीवर वनमंत्री गणेश नाईक आणि मुंब्रा कळवा मतदारसंघाचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड या दोघांनीही पाठ फिरवली.

गेल्या काही महिन्यांपासून गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायची एकही संधी सोडत नाही. जितेंद्र आव्हाड यांचं राजकारण शिंदे यांच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे अडचणीत आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या दोन्ही नेत्यांच्या गैरहजेरीची चर्चा अधिक रंगली होती.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ नेते तसेच वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. नाईक यांचा राज्यमंत्री मंडळात समावेश झाल्या नंतर हा संघर्ष आणखी वाढला. नाईक यांचा जनता दरबार बंद करण्याकरिता नवी मुंबईच्या शिंदे सेना पदाधिकाऱ्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. यामुळे हा संघर्ष आणखी चिघळला आहे.

नवी मुंबईतील विविध प्रश्नांवर गणेश नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शिंदे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण तालुक्यातील चौदा गावांचा नवी मुंबई महालपालिकेत समावेश करण्यावरून नाईक चिडले आहेत. या गावांचं लोढणं नवी मुंबईकरांच्या माथी का असा त्यांचा सरळ सवाल आहे. नवी मुंबई पाणी, भूखंड वाटपावरूनही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मध्यंतरी तर गणेश नाईक यांनी ठाण्यात भाजपाची सत्ता आणायची असेल तर अहंकारी रावणाचे दहन करावं लागेल असं वक्तव्य केले. दहा तोंडाच्या रावणाची उपमा त्यांनी कोणाला दिली अशी चर्चा या निमित्ताने रंगली होती. गणेश नाईक यांच्या या टीकेनंतर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील जोरदार आक्रमक झाली असून ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही गणेश नाईक यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मात्र त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे.

जिल्हा नियोजन समित्यांच्या बैठकीला एक वेगळे महत्व असते. जिल्यातील वेगवेगळे प्रश्न, विविध विकास योजना यासाठी द्यावा लागणारा निधी याची आखणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत होत असते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नसल्यामुळे आमदार आणि खासदारांमध्ये नाराजीचा सूर होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली.

त्यास गणेश नाईक आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड अनुपस्थित राहिले. गणेश नाईक यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. यामुळे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत ते उपस्थितीत राहतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान नाईक या बैठकीकडे फिरकलेच नाहीत याची चर्चा सगळी कडे होती.
.