कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागातील करोना काळातील फेव्हिपिअर या औषधी गोळ्यांचा दोन ट्रक भरेल इतका लाखोच्या संख्येतील साठा पालिका वरिष्ठांची मान्यता न घेताच पालिकेच्या कल्याणमधील उंबर्डे येथील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट केंद्रावर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी नेला. विल्हेवाट केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पालिका वरिष्ठांची ना हरकत असल्याशिवाय या औषधी गोळ्यांची विल्हेवाट लावण्यास नकार दिल्याने आरोग्य विभागातील नवीन गोंधळ बाहेर आला आहे.
पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त बोरकर यांनी डोंंबिवलीतील गरीबाचापाडा औषध साठा भांडार केंद्राचा प्रमुख फार्मासिस्ट भोजराज भगत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
करोना महासाथीच्या काळात सन २०२१ च्या काळातील या फेव्हिपिअरच्या गोळ्या आहेत. या गोळ्यांची मुदत सन २०२३ मध्ये संपली आहे. करोना महासाथीच्या काळात शासनाकडून, काही खरेदी करून महापालिकांना औषध साठा पुरवला जात होता. दोन वर्षापूर्वी मुदत संपूनही त्यावेळीच या गोळ्यांंची विल्हेवाट का लावली नाही, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
पालिकेच्या मुख्य लेखा परिक्षकांनी मुदत संपलेल्या या गोळ्यांची विहित प्रक्रिया पूर्ण करून विल्हेवाट लावण्याचे आरोग्य विभागाला सूचित केले होते. औषध साठा भांडार कक्ष प्रमुखाने या साठ्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना देऊन वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या गोळ्या जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट केंद्रावर नेणे बंधनकारक होते. वरिष्ठांची परवानगी न घेताच ही मुदत संपलेली औषधे उंबर्डे येथील जैव वैद्यकीय कचराभूमीवर नेल्याने हे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे.
आयुक्त गोयल यांच्या आदेशावरून उपायुक्त बोरकर यांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल या प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेत आहेत. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते गणेश ताटे, रूपेश भोईर यांच्या पहिले निदर्शनास आला. त्यांनी आयुक्त, इतर वरिष्ठांना यासंदर्भातची माहिती दिली. वैद्यकीय विभागातील कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवत याप्रकरणातून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते.
सीरप बाटल्या कचराभूमीवर
मुदत संपलेल्या या औषध साठ्यांमध्ये चालू स्थितीत असलेल्या सीरपच्या ८० बाटल्या आढळून आल्या आहेत. या बाटल्या याठिकाणी कोणी आणल्या याविषयी संशयास्पद परिस्थिती आहे. मुदत संपलेल्या औषधांमध्ये या बाटल्या नव्हत्या, असे सांगण्यात येते.
पालिकेच्या औषध साठा भांडार कक्षातील करोना काळातील मुदत संपलेल्या गोळ्या विहित प्रक्रिया पार न पाडता जैव वैद्यकीय कचरा केंद्रावर विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आल्या आहेत. यामध्ये चालू सीरपच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी सुरू करून एका कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. – प्रसाद बोरकर,उपायुक्त, वैद्यकीय विभाग.