कल्याण – कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील एका तरूणाचा गुरूवारी डेंग्युने मृत्यू झाला. कल्याण, डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांसह अनेक भागात डेंग्युने बधित रूग्ण असताना कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन याविषयी प्रभावी उपाययोजना करत नाही. वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांचे वैद्यकीय आरोग्य विभागावर नियंत्रण नाही. त्यांच्याकडे शहरातील साथ आजारातील रुग्णांची माहिती नाही. त्यामुळे डॉ. शुक्ला यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कल्याण पश्चिमेचे मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयासमोरील ठिय्या आंदोलनाच्यावेळी केली.

कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील विलास म्हात्रे (३१) या तरूणाचा गुरूवारी डेंग्युने मृत्यू झाला. शहरात डेंग्युने बळी जात असताना प्रशासन थंड बसले असल्याने मनसेच्या कल्याणमधील कार्यकर्त्यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पावसाळा सुरू आहे. शहरात साथ आजार उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने घ्यावयाची काळजी. तसेच, कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागात डेंग्युचे अनेक रुग्ण घरांमध्ये उपचार घेत आहेत. ही सर्व माहिती आपण पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना दिली. त्यानंतर पालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांची भेट घेऊन त्यांना साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे सुचविले.

शहरात दीड महिन्याच्या कालावधीत किती साथ आजाराचे रुग्ण आहेत याची माहिती डॉ. दीपा शुक्ला यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना यासंदर्भात कसलीही माहिती नव्हती किंवा देता आली नाही. असे अनभिज्ञ वैद्यकीय अधिकारी असतील तर रुग्णांचे भवितव्य कठीण आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे विलास म्हात्रे सारखे रुग्ण जीव गमावत आहेत, अशी टीका माजी आमदार प्रकाश भोईर यांनी माध्यमांसमोर केली.

दोन हजार कोटीचा अर्थसंकल्प असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेची आरोग्य यंत्रण सुसज्ज पाहिजे. पण कल्याण डोंबिवलीतील डेंग्यु रुग्णांचे तपासणी अहवाल अंतीम चाचणीसाठी ठाणे येथे पाठवले जातात, हे आश्चर्य असल्याचे माजी आ. भोईर यांनी सांगितले. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात ढिसाळ कारभार सुरू आहे. कोणाचे कशावर नियंत्रण नाही. या सगळ्या ढिसाळ व्यवस्थेला जबाबदार धरून डॉ. शुक्ला यांना निलंबित करावे, अशी मागणी मनसेने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले, पावसाळ्यात साथ आजार उद्भवू नयेत म्हणून प्रशासनाने मे अखेरपासून शहराच्या विविध भागात घरोघरचे सर्वेक्षण सुरू केले आहे. दीड लाख नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी केली आहे. २८ हजार कंंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये ३२५ कंटेनर पाॅझिटिव्ह आढळले. या भागातील पाण्यात तयार झालेल्या अळ्या नष्ट करण्यात आल्या आहेत. बांधकामधारकांना नोटिसा काढून बांधकामाच्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही अशी तंबी देण्यात आली आहे. जंतुनाशक फवारणी सुरू आहे. नागरिकांनी सात दिवसानंतर घरातील पाणी साठा बदलावा यासाठी जनजागृती केली जात आहे.