कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील वर्दळीच्या भागात अवंतरा स्पा या मसाज केंद्रात छापा टाकून महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने तीन जणांना ताब्यात घेऊन या मसाज स्पा केंद्रातील दहा पीडित मुलींची सुटका केली. या प्रकरणात दोन जण अटक करण्यात आले आहेत, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.
कल्याण रेल्वे स्थानक भागातील गजबजलेल्या भागात सुरू असलेल्या अवंतरा मसाज स्पा केंद्रात काही गैरप्रकार सुरू असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांना मिळाली होती. त्यांनी बनावट ग्राहक तयार करून पोलिसांच्या साहाय्याने या मसाज केंद्राची पाहणी केली. त्यांना मसाज केंद्रात मुलींची संख्या अधिक प्रमाणात आहे. याठिकाणी ग्राहक म्हणून येणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या गैर सेवा दिल्या जात असल्याचे पोलीस पडताळणीत दिसून आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, शोध पथक, गुप्त वार्ता विभागाच्या पोलिसांनी एका वेळी अवंतरा स्पा केंद्रात छापा टाकला.
या छाप्याच्यावेळी या केंद्रात दहा महिला होत्या. महिलांना या केंद्रात नोकरीवर ठेऊन त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनाम करून या मसाज केंद्राचे व्यवस्थापक नौशाद शेख, या केंद्राचे चालक योगेश चव्हाण, भीमसेन नाईक यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे साहाय्यक पोलीस आयुक्त घेटे यांनी सांगितले.
डोंबिवलीत स्पा केंद्रांचा सुळसुळाट
डोंंबिवली शहराच्या विविध भागात मसाज स्पा केंद्र काही व्यावसायिकांनी सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू आहेत. या केंद्रांना पालिका, पोलीस, महसूल अशा कोणत्याही शासकीय यंत्रणांचा परवाना नसतो. इमारतीमधील गाळा, व्यापारी दुकान, दुकानांच्या इमारतींमध्ये ही अलिशान केंद्रे थाटण्यात आली आहेत. या केंद्रात येणाऱ्या ग्राहकांकडून दामदुप्पट पैसे उकळून मसाज केंद्र चालक वेश्या व्यवसाय चालवित आहेत. त्यामुळे या केंद्रांची पोलिसांनी पाहणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी डोंबिवलीतील वकील ॲड. मंगेश कुसुरकर यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
शहाडमध्ये महिला अटकेत
शहाड रेल्वे स्थानक भागात गरजू तरूणींना वेश्या व्यवसायात ओढून त्यांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या टिटवाळा येथील एका मध्यस्थ महिला भावना संतोष म्हात्रे (२४) या महिलेला अनैतिक मानवी मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांच्या पथकाने शहाड येथील शहाड नाका भागातून अटक केली. त्या मूळच्या औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. या व्यवसायातील बहुतांशी महिला या परप्रांतीय असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात भावना म्हात्रेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.