कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर रात्रीच्या वेळेत एका रिक्षा चालकाने भिवंडीतील एका प्रवाशाच्या अंगावर रिक्षा घालून त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री खडकपाडा, बेतुरकरपाडा भागात रिक्षेचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांची माहिती घेण्यासाठी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात गेलेल्या एका पत्रकाराला तीन रिक्षा चालकांनी घेरून त्यांच्या सोबत अरेरावी केली.

पत्रकारा सोबत अरेरावी सुरू असताना काही प्रवाशांनी कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानका बाहेरील रिक्षा चालक नेहमीच प्रवाशांना भाडे घेण्यावरून वाद घालत असतात. प्रवाशांशी उध्दटपणे बोलतात. रिक्षा चालक रिक्षा रिकाम्या उभ्या असताना भाडे घेण्यास नकार देतात, अशा तक्रारी केल्या. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात संध्याकाळच्या वेळेत बेतुरकरपाडा, खडकपाडा येथे जाण्यासाठी रिक्षा वाहनतळावर रिक्षा रिकाम्या उभ्या असतात, पण ते प्रवासी भाडे घेत नाहीत. रिक्षा वाहनतळावर दररोज दीडशेहून अधिक प्रवासी रिक्षेची वाट पाहत उभे असतात. हे रिक्षा चालक भाडे घेण्यास तयार होत नाहीत. रिक्षा चालकांचा हा दररोजचा प्रकार आहे. याविषयी वाहतूक विभागाकडे तक्रारी करूनही उपयोग होत नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी पत्रकार विजय ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी पत्रकार ठाकरे आणि सहकारी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री गेले होते.

यावेळी रेल्वे स्थानकाबाहेर शंभरहून अधिक प्रवासी रांगेत उभे असल्याचे आणि बाजुला रिक्षा वाहनतळावर काही रिक्षा चालक रिक्षा रिकाम्या असताना प्रवाशांना रिक्षेतून सोडण्यास तयार नव्हते असे चित्र पत्रकार ठाकरे यांना दिसले. हा सगळा प्रकार त्यांनी आपल्या जवळील कॅमेऱ्यातून दृश्यध्वनी चित्रणातून टिपण्याचा प्रयत्न केला. यावेळी तीन रिक्षा चालक अचानक पत्रकार ठाकरे यांच्या अंगावर धाऊन आले. त्यांनी ठाकरे यांना तुम्ही आमच्या रिक्षेचे चित्रण का केले. तुम्हाला आमच्या रिक्षेचे दृश्यचित्रण करून काय मिळणार आहे, असे प्रश्न करू लागले. यावेळी प्रवाशांच्या तक्रारीवरून आपण याठिकाणी वार्तांकन करण्यासाठी आलो आहोत, हे सांगुनही रिक्षा चालक अरेरावीची भाषा कमी करत नव्हते.

शेवटी तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला कोणी काही करू शकत नाही, अशी उर्मट भाषा पत्रकारा बरोबर रिक्षा चालकाने वापरली. हाच अनुभव दररोज बेतुरकरपाडा, खडकपाडा, आरटीओ, भोईरवाडी, बिर्ला महाविद्यालय , लालचौकी, उंबर्डे, आधारवाडी, सोनावणे महाविद्यालय, गांधारे भागात जाणारे प्रवासी घेत आहेत.

गेल्या पंधरा दिवसापूर्वी प्रवाशाशी उर्मट वर्तन करणाऱ्या नांदिवली तर्फ येथील रिक्षा चालकाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांनी साडे सहा हजार रूपयांचा दंड ठोठावला होता. बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक, आरटीओ विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करावी, अशी आमची सततची या विभागांकडे मागणी आहे. ती कारवाई होत नसल्याने हे प्रश्न निर्माण होत आहेत, असे रिक्षा संघटनेचे संतोष नवले यांनी सांगितले.