दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉन संसर्ग झाला. यानंतर नायजेरियातून डोंबिवलीत आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे महानगरपालिका सतर्क झाली आहे. महानगरपालिकेने त्यांच्या संपर्कात असलेले नातेवाईक व इमारतीत राहणाऱ्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR Test) केली आहे. मात्र, पालिकेला मिळालेल्या २९५ पैकी १०९ जणांशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “विविध देशातून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या २९५ नागरिकांची यादी पालिका शासनाला मिळाली आहे. त्यापैकी ८८ नागरिकांची अँटीजन टेस्टिंग करण्यात आली. यापैकी ३४ लोकांचा अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ४८ प्रवाशांचे अहवाल येणे बाकी आहे. या यादीतील १०९ जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. काही प्रवाशांचे फोन स्विच ऑफ आहेत, तर काही प्रवाशांच्या घराला कुलूप आहे. त्यामुळे पालिका वैद्यकीय कर्मचारी त्यांचा शोध घेत आहे.”

“मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई होणार”

“परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. यानुसार परदेशातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस गृहविलगीकरण बंधनकारक करण्यात आलंय. ७ दिवसानंतर करोना चाचणी आणि चाचणीनंतर ७ दिवस क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांबाबत आदेश काढले असून उद्यापासून कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी पोलिसांबरोबर पालिका संयुक्त कारवाई करेन,” अशी माहिती आयुक्त विजय सूर्यवंश यांनी दिली.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत सिमेंट रस्ते घोटाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, केडीएमसी क्षेत्रात ७२ टक्के नागरिकांचा पहिला आणि ५२ टक्के नागरिकांचा दुसरा करोना विरोधी लसीचा डोस पूर्ण झाला आहे.