डोंबिवली – गेल्या वर्षी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते शिळफाटा रस्त्यावरील रुणवाल गार्डन गृहसंकुल बससेवा या संकुलातील रहिवाशांच्या मागणीवरून कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने सुरू केली होती. ही बस काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिन्यांपासून बंद होती.

शिळफाटा रस्त्यावरील प्रीमिअर मैदानासमोरील रुणवाल गार्डन गृहसंकुलातील बहुतांशी रहिवासी हा नोकरदार, व्यावसायिक आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरात नोकरीला जाणार आहे. या गृहसंकुलातील रहिवाशांना सकाळच्या वेळेत शिळफाटा रस्त्यावर आणि संध्याकाळी कामावरून परतल्यावर डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात वेळेवर रिक्षा मिळणे मुश्किल होत होते. एक रिक्षा आणि त्यामागे पंधरा प्रवासी धावत असल्याचे चित्र होते. यामध्ये महिला प्रवाशांचे खूप हाल होत होते. या संकुलातील ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांना रेल्वे स्थानक भागात जायचे असेल तर त्यांचेही रिक्षेअभावी हाल होत होते.

रुणवाल गार्डन भागातील जागरूक रहिवाशांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांना पत्र देऊन कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते रुणवाल गार्डन गृहसंकुल बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर बससेवा सुरू झाली. पण त्यानंतर काही महि्न्यात ही बस सेवा तांत्रिक कारणामुळे बंद पडली. या संकुलातील रहिवाशांचे बस अभावी हाल सुरू झाले होते. ही बस बंद पडल्यानंतर कोणाही लोकप्रतिनिधी ही बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

रुणवाल गार्डनमधील नोकरदार वर्गाची प्रवासाची अडचण विचारात घेऊन या संकुलातील रहिवाशांच्या मागणीप्रमाणे कल्याण ग्रामीणचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाकडे पत्रव्यवहार करून डोंबिवली रेल्वे स्थानक ते रुणवाल गार्डन संकुल बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिवहन विभागाचे व्यवस्थापक रमेश व्दासे, परिवहन आगार व्यवस्थापक किशोर घाडी यांनी रुणवालमधील रहिवाशांची मागणी विचारात घेऊन डोंंबिवली रेल्वे स्थानक ते रुणवाल गार्डन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आगार व्यवस्थापकांनी तसे निर्देश परिचालन विभागाला दिले. ही बससेवा सुरू झाल्याने या गृहसंकुलातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.