ST corporation / ठाणे : गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. यात ठाणे विभागात २ हजार ६३० बसगाड्यांचे नियोजन होते. त्यामुळे तब्बल ९६ हजार ५१० प्रवाशांनी प्रवास केला. गणेशोत्सव काळातील या विशेष नियोजनामुळे एसटीच्या तिजोरीत ६ कोटी ९१ लाख ६ हजार ५३२ रूपयांच्या उत्पन्नाची भर पडली.
कोकणात गणेशोत्सव, शिमगा हे सण पारंपारिक पद्धतीने साजरे होतात. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये कोकणातील रहिवासी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अधिक संख्येने राहतात. परंतु सण उत्सव साजरे करण्यासाठी ते आपल्या मुळ गावी जातात. या सर्व प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे आणि एसटी विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. यामुळे प्रवाशांना आधीच आरक्षण करून कोणत्याही त्रासाविना आणि गर्दी विना कोकणात जाता आले.
ठाणे विभागाच्या सात आगारांतून गणेशोत्सवासाठी चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, लांजा, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी जादा बसगाड्या सोडण्यात आल्या, त्यामुळे या ठिकाणच्या प्रवाशांची सोय झाली. या बससाठी प्रवाशांनी आगाऊ नोंदणी केली होती. ठाणे विभागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी १९४ बसगाड्यांची व्यवस्था होती. परंतु प्रवाशांची वाढती संख्या पाहता इतर विभागातून २ हजार ४३६ बसगाड्यांची मदत घेण्यात आली होती.
त्याचबरोबर गणेशोत्सवानंतर कोकणहून ठाणेकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष बससेवा सुरू करण्यात आली होती. या परतीच्या प्रवासासाठी मुंबई आणि ठाणे विभाग मिळून २५८ बसगाड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा तब्बल ९६ हजार ५१० प्रवाशांनी प्रवास केला. या विशेष नियोजनामुळे एसटीच्या ठाणे विभागाला ६ कोटी ९१ लाख ६ हजार ५३२ रूपयांचे उत्पन्न मिळाले. या एसटी विभागाच्या नियोजनामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला, तसेच एसटी महामंडळालाही चांगले आर्थिक यश मिळाले.
कोट
यंदाच्या गणेशोत्सवासाठी वाहतूक विभागातील सर्व चालक वाहक आणि अधिकारी वर्ग यांच्या सहभागाने नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक पार पडली. यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत अधिकाधिक प्रवाशांनी प्रवास केला. – सागर पळसुले, विभाग नियंत्रक, ठाणे एसटी.