डोंबिवलीतील नाटय़गृहात शिवसेना-भाजपची जुगलबंदी

कल्याण : करोना र्निबधांमुळे सध्या नाटय़गृहे बंद असली तरी, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात मंगळवारी शिवसेना-भाजपमधील मैत्री आणि कटूतेचा प्रयोग चांगलाच रंगला. कोपर पुलाच्या उद्घाटन सोहळय़ात स्थानिक भाजप आमदार समस्यांचा पाढा वाचून पालिका तसेच राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करत असतानाच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांमधील दरी कमी करण्यासाठी पालक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र भाजपवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका केली.

कोपर पुलाच्या उद्घाटनासह कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा कार्यक्रम डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भिवंडीचे खासदार असलेले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण आदी शिवसेना-भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका तोंडावर असताना आयोजित या कार्यक्रमात राजकीय वातावरण तापणार, अशी चिन्हे होती. त्यानुसार घडले. कार्यक्रमात भाषण करताना भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना-भाजप युती, दुरावलेले संबंध यावर टिप्पणी करतानाच शहरातील समस्यांचा पाढा वाचून दाखवला. ही कामे राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री, पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी पूर्ण करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांचे भाषण संपल्यानंतर भाजप-शिवसेनेच्या उपस्थित कार्यकत्र्य़ानी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

खासदार शिंदे यांनी ‘हा राजकीय कार्यक्रम नाही. युतीत राहून यापूर्वी आपण कामे केली आहेत. भाजपचे अनेकजण आमचे आजही मित्र आहेत,’ अशा शब्दांत चव्हाण यांना सुनावले.  तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘फलकबाजी आणि निधी आणून कामांचे फक्त नारळ फोडणे म्हणजे विकास नव्हे’ अशी टीका केली. कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांवर पालिकेने आकारलेला घनकचरा कर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसारच लागू करण्यात आला आहे, असे  सांगत त्याबद्दल चव्हाण यांनी केलेली टीका शिंदे यांनी परतवून लावली. सभागृहातील नेत्यांमध्ये कटूतेचे दर्शन घडत असताना दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेले मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्यात मात्र, ‘स्ट्राँग कनेक्शन’ दिसून आले. ‘पूल सुरू झाल्याने दोन्ही बाजूच्या नागरिकांना रस्ते खुले झाले. आता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधील दरी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आणि पालकमंत्री शिंदे यांनी प्रयत्न करावेत,’ असे पाटील म्हणाले. त्यांच्या भाषणादरम्यान नेटवर्कमुळे व्यत्यय आला. त्यावेळी आपल्याला त्यांचा आवाज व्यवस्थित ऐकू येत होता, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘तिथे तुमचे कनेक्शन तुटले होते. मात्र, माझ्याशी स्ट्राँग कनेक्शन आहे’ अशी कोपरखळी त्यांना लगावली. तसेच ‘रवींद्र चव्हाण यांच्याशी कनेक्शन लूज (कमकूवत) झाल्याने ठिणग्या उडत आहेत’ अशी टिप्पणी त्य़ांनी केली. त्यावर ‘ते स्क्रू ड्रायव्हरने टाइट करून घ्या’ असे उत्तर पाटील यांनी दिले. त्यावरून वातावरणही सैल झाले.

‘आता वेळ सुरू झाली..’

कपिल पाटील यांच्या भाषणात नेटवर्क समस्येमुळे व्यत्यय आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण सुरू केले. त्यांचे भाषण संपत असताना पाटील यांच्याशी दूरसंपर्क प्रस्थापित झाला. त्यावेळी शिंदे यांनी पाटील यांचा उल्लेख ‘खासदार’ असा करताच ‘केवळ खासदार नाही, मंत्री’ अशी आठवण पाटील यांनी त्यांना करून दिली. त्यावर ‘अरे तुमचा आवाज तर बंद होता. आता सुरू झाला’ असा टोला शिंदे यांनी लगावला. त्यावर पाटील यांनी ‘माझी वेळ संपली नाही, आता सुरू झाली’ असे प्रत्युत्तर देताच सभागृहात हशा पिकला.

डोंबिवलीतील पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या कोपर पुलाचे उद्घाटन मंगळवारी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.