लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूरः यापूर्वीच्या अंदाजाप्रमाणे राज्यासह ठाणे जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन मंगळवारी झाले. २०१४ वर्षानंतर पहिल्यांदाच पाऊस इतका उशिराने आला. त्यातही अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपोरजॉय वादळामुळे मोसमी पाऊस कमजोर असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारपासून २४ तासात ठाणे जिल्ह्यात सरासरी ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात जोरदार पावसासाठी आणखी दहा दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता खासगी हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

यंदाच्या वर्षात एल निनो प्रभावामुळे राज्यातील मोसमी पावसावर परिणाम होण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या मोसमी पावसासाठी १३ जूनची वाट पाहावी लागली. राज्यासह ठाणे जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन मंगळवारी झाले. ठाणे जिल्ह्याचा सर्वच भाग या मोसमी पावसाने व्यापला. मात्र गेल्या काही वर्षातल्या आकडेवारीनुसार हा पहिला पाऊस त्याच्या स्वभावाला साजेसा पडला नसल्याचे खासगी हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत जोशी शाळेजवळून ठाकुर्लीत वाहने नेण्यास प्रतिबंध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलापूर येथे आपल्या खासगी वेधशाळेच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करणारे अभिजीत मोडक यांनी केलेल्या नोंदीनुसार यंदाचा पाऊस कमजोर पडला आहे. जिल्ह्यात यापूर्वी पहिला पाऊस म्हटलं की जोरदार असतो. मात्र यंदा जिल्ह्यात सरासरी ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे मोडक यांनी सांगितले आहे. यंदाच्या पावसावर एल निनोसह अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचाही परिणाम झाला आहे. या चक्रीवादळामुळे मोसमी वारे ओढले गेले. त्यात पाऊस कमजोर झाला. त्यामुळे पावसाला उशिरही झाला. गेल्या दहा वर्षात दुसऱ्यांदा पावसाचे आगमन उशिराने झाले आहे. यापूर्वी २०१४ वर्षात १३ जूनला पाऊस आला होता. त्यावेळी अरबी समुद्रात नानौक वादळ तयार झाले होते. यंदाही समुद्रातील वादळामुळे पावसाचे उशिराने आगमन झाले आहे.

२४ तासातील पाऊस

  • मुंब्रा- ५४
  • दिघा- ३९
  • ऐरोली- ३८
  • घनसोली- ३८
  • नेरूळ- ३३
  • ठाणे- ३२
  • दिवा- ३०
  • डोंबिवली- ३६
  • बदलापूर- २४