कल्याण : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून गेल्या महिनाभराच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरात चोरट्या मार्गाने आणलेल्या दारूची आवक वाढली आहे. चाळी, झोपडपट्यांमध्ये या दारूचा सर्वाधिक वापर काही राजकीय मंडळींकडून मतांसाठी केला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत डोंबिवली, कल्याण शहरांच्या विविध भागात कल्याण गु्न्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून लाखो रूपयांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन होता. या दिवशी दारू विक्रीवर बंदी होती. तरीही कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात दारूचा चोरट्या मार्गाने साठा आणून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली होती.

हेही वाचा… ठाणेकरांसाठी पालिकेची कर सवलत योजना, दहा टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत मिळणार करसवलत

गु्न्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांंना हवालदार भोसले यांनी ही माहिती दिली. पवार यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेचे हवालदार गुरुनाथ जरग, दत्ताराम भोसले, दीपक महाजन, गोरक्ष रोकडे, विश्वास माने कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात पाळत ठेवली. त्यावेळी भोसले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून तिसगाव भागातील विजयनगर नाक्या जवळ दारू विक्री सुरू असल्याचे समजले. सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी तातडीने आपला मोर्चा विजयनगर नाक्याजवळ वळविला. तेथे कैलास काशिनाथ कुऱ्हाडे (४५, रा. जनाबाई निवास चाळ, तिसगाव) हा या भागात चोरून दारू विकत असल्याचे पोलिसांना समजले.

हेही वाचा… ‘इंजिन’ची दिशा बदलताच मनसेला पथकराचा विसर 

पोलिसांनी या माहितीची खात्री करून कैलास कुऱ्हाडेच्या घरात छापा मारला. त्यावेळी तेथे देशी, विदेशी दारूच्या २०० हून अधिक बाटल्या आढळल्या. पोलिसांनी दहा हजाराहून अधिक किमतीची दारू जप्त केली. पोलिसांनी कैलासला अटक करून त्याच्या विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता कोळसेवाडी पोलीस कैलासची चौकशी करत आहेत. ही दारू त्याने कोठुन आणली आणि तो ती कोणाला देणार होता. कोणाच्या सांंगण्यावरून त्यांनी हा बेकायदा दारूसाठा ताब्यात बाळगला अशा विविध माध्यमातून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दारू साठ्यामागे काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे.