scorecardresearch

साहित्य संमेलन अध्यक्षांची निवड गुणवत्तेवरच व्हावी; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची स्पष्टोक्ती

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी समाजमाध्यमांद्वारे राजकीय भूमिका मांडली होती.

ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची स्पष्टोक्ती

ठाणे : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होणारी निवड ही विवेक आणि गुणवत्ता याच्या बळावरच व्हायला हवी. जर या दोन गोष्टी लक्षात घेऊन अध्यक्षांची निवड झाली तर आगामी सर्व साहित्य संमेलने निर्विवाद पार पडतील, अशी स्पष्टोक्ती आगामी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केली.

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री स्थानक पुरस्कार वितरणाच्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सासणे यांचा मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेतर्फे सत्कारही करण्यात आला.

सध्याची नवीन पिढी वाचनापासून दूर जात आहे. जर मुलांना इंग्रजी भाषेविषयी गोडी असेल तर किमान त्या भाषेतील तरी उत्तम पुस्तके पालकांनी त्यांना उपलब्ध करून द्यायला हवी. जेणेकरून बालवयातच ही मुले इतर भाषेतील साहित्याबरोबरच मराठी साहित्याकडेही वळतील, असे मत  सासणे यांनी व्यक्त केले.  दुकानांवरील मराठी पाट्यांविषयी शासनाने घेतलेल्या निर्णयावर भाष्य करताना या निर्णयामुळे मराठी भाषेला अनुकूल वातावरण तयार होईल आणि मराठीबद्दलची मानसिकता बदलेल असे ते म्हणाले.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी समाजमाध्यमांद्वारे राजकीय भूमिका मांडली होती. यामुळे त्यांना मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आले, अशा चर्चा होती. त्यासंदर्भात सासणे यांनी या प्रकरणाविषयी मला पूर्ण कल्पना नाही, मात्र कलाकाराने एखादी राजकीय भूमिका घेतली म्हणून त्याला मालिकेतून किंवा सिनेमातून काढून टाकणे अत्यंत चुकीचे असल्याचे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्याचबरोबर आगामी साहित्य संमेलनात राजकीय चर्चा होण्यापेक्षा ते साहित्यकेंद्रित कसे होईल त्यावर भर दिला जाईल. यासाठी साहित्य क्षेत्राशीच संबंधित मान्यवर व्यासपीठावर कसे येतील यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सासणे म्हणाले. साहित्य राज्याच्या गावोगावी पोहोचावे यासाठी येत्या काळात गाव तिथे ग्रंथदालन किंवा मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी पुस्तकांचे दालन सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच मराठी साहित्यात अद्भुत रस लिखाणाचा अभाव आहे. या प्रकारातील साहित्यात जर अजून लिखाण झाले तर लहान मुलांबरोबरच तरुण पिढीही आवडीने मराठी वाचन करेल, असे प्रतिपादन सासणे यांनी या वेळी केले. 

या कार्यक्रमा वेळी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर आणि विश्वस्त पंचांगकर्ते दा.कृ.सोमण, कार्याध्यक्ष विनायक गोखले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लेखकाने सत्य मांडायला हवे!

समाजात घडत असलेल्या घटनांविषयी प्रत्येक लेखकाने व्यक्त व्हायला हवे, भूमिका घ्यायला हवी. आपली भूमिका मांडताना कायम सत्याच्या आधारानेच भूमिका मांडायला हवी, असे प्रतिपदान सासणे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी भाषण करताना केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Literary convention presidents should be selected on merit akp

ताज्या बातम्या