जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : महायुतीची जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी  प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम असल्याच्या चर्चेमुळे शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भाजपचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक अथवा त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्यासाठी भाजपने या जागेवर दावा केला असून मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यातील जागेसाठी झुंजावे लागत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. विशेष म्हणजे, ही जागा मुख्यमंत्र्यांना सोडावी लागली तरी दोघांच्या सहमतीचा उमेदवार म्हणून संजीव नाईक यांनी धनुष्यबाण चिन्हावर हि निवडणूक लढवावी असा प्रस्तावही भाजपने मुख्यमंत्र्यांपुढे ठेवल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.  आतापर्यत सात खासदारांना उमेदवारी मिळवून देण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. जागा वाटपाच्या चर्चेच्या पहिल्या फेरीत मुख्यमंत्र्यांनी बाजी मारल्याचे चित्र यामुळे पुढे येत असले ठाणे, कल्याण, पालघर या मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा राहीलेल्या भागातील मतदारसंघाचे चित्र अजूनही स्पष्ट होत नसल्यामुळे त्यांच्या समर्थकांमधील अस्वस्थता  शिगेला पोहचली आहे.

हेही वाचा >>> अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

ठाण्याचा तिढा कायम ?

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन मतदारसंघात भाजपचे आमदार असून मिरा-भाईदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यादेखील पूर्वाश्रमीच्या भाजपच्या आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा असल्याची कल्पना असूनही भाजपने सुरुवातीपासून या मतदारसंघावर दावा केला आहे. लगतच असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात अजूनही मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. असे असले तरी गेल्या आठवडयात येथील भाजप नेत्यांनी शिंदे यांच्यासाठी  मतदारसंघात वेगवेगळया ठिकाणी मेळावे आयोजित केले होते. त्यामुळे कल्याणचा तिढा सुटल्याचे चित्र निर्माण झाले होते. असे असले तरी शिंदे गटाच्या पहिल्या यादीत ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. ठाण्याचा तिढा सुटत अजूनही कायम असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाईकांच्या चर्चेमुळे अस्वस्थता वाढली

ठाणे लोकसभेवर दावा सांगताना भाजपने येथून गणेश नाईक किंवा त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव यांच्यासाठी आग्रह धरल्याची सध्या चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्याने ठाणे शिंदे यांच्या शिवसेनेला सुटले तरी नाईकांना धनुष्यबाण या चिन्हावर लढवावे असा प्रस्तावही भाजपकडून ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. या मतदारसंघात भाजपच्या ‘चाणक्यांनी’ केलेल्या सर्वेक्षणात संजीव नाईक यांचे नाव आघाडीवर असल्याचे दावे यानिमित्ताने केले जात आहे. या चर्चेमुळे ठाणे, नवी मुंबईतील मुख्यमंत्री समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली असून स्वपक्षाच्या नेत्यांनाच संधी द्यावी अशी भूमिका यापैकी काहींनी शिंदे पिता-पुत्रांकडे मांडल्याचे समजते. नवी मुंबईतील मुख्यमंत्री समर्थकांनी तर नाईकांना उमेदवारी दिल्यास आम्ही विरोधात काम करू असा पवित्रा घेतल्याने या जागेची गुंतागूत आणखी वाढली आहे. यासंबंधी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कुणीही मतप्रदर्शन करण्यास तयार नसल्याचे दिसून आले.