बदलापूरः गोवंश जातीच्या जनावरींची बेकायदेशीरपणे कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर बदलापुरात गोमांस विक्री प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जून महिन्यात पोलिसांनी बदलापुरातील गावात याप्रकरणी कारवाई केली होती. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असून त्यांतील काही आरोपींचा शोध सुरू आहे.
राज्यात पहिल्यांदाच गोमांस विक्री प्रकरणी मोक्का कलमांन्वये कारवाई होत असल्याने गोमांस विक्रीचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बदलापूर आणि आसपासच्या परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची हत्या करून गोमांस विक्री केली जात असल्याचा प्रकार बदलापुरात समोर आला होता. अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या गोपनीय माहितीनंतर ९ जून रोजी बदलापुर गावात पोलीस पथकाने छापा टाकला होता. येथे गोमांस आढळल्याने याप्रकरणी बदलापुर पश्चिम पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा प्राथमिक तपास सुरु होता. त्यानंतर बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांच्याकडे हा तपास देण्यात आला. या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध घेतला जात होता. त्या तपासात ८ जुलैला कैफ मन्सुर शेख हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे तपासात इतर आरोपींची आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती समोर आली. आरोपी संघटीत गुन्हेगारी पद्धतीने टोळी बनवुन त्यांचा म्होरक्या कैफ मन्सुर शेख याच्या नेतृत्वाखाली गोवंशाची चोरी करणे, गोवंश जनावरांना निर्दयतेने वागणूक देणे, त्यांची कत्तल करून अवैध गोमांस विक्री करणे असे गुन्हे करत होते.
पावसाळी अधिवेशनात गोवंश हत्या बंदीच्या कायद्याची अमलबजावणी आणि अवैध कत्तलखाने या प्रश्नावर बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अशा कत्तलखान्यांवर तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही तासातच बदलापुरातील सात अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर चालवण्यात आला. त्याचवेळी पोलिसांनी याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करता येईल का याबाबत चाचपणी सुरू केली होती. अखेर या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ च्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
कैफ मन्सुर शेख आणि उदली उर्फ सैफ मन्सुर शेख यांना न्यायालयाने २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ चारचे पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे हे याप्रकरणी पुढील करीत आहेत.
यातील मुख्य आरोपीवर आधीच अटकेची कारवाई झाली होती. त्यातील दोन आरोपींचा शोध सुरू होता. पोलिसांच्या पथकाला दोन आरोपींना शोधण्यात यश आले. पूर्वातिहास पाहता या गुन्ह्यात आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. – सचिन गोरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार.