ठाणे : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) राज्यभरातील एकूण ८०९ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल १९७ प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मंजूर झाले आहेत. यात मुंबई शहर आणि उपनगरातील ६३, ठाण्याचे ५८, रायगडचे ४१, पालघरचे २२, रत्नागिरीचे ९ आणि सिंधुदुर्गचे ४ प्रकल्पांचा समावेश आहे. या मंजुऱ्यांमुळे महानगर प्रदेशातील गृहनिर्माण क्षेत्रात नव्या गतीने चैतन्य निर्माण झाले असून, येत्या काही महिन्यांत या सर्व शहरांमध्ये मोठाली गृहसंकुले उभी राहणार आहेत.

मुंबई आणि परिसरातील स्थावर संपदा बाजार गेल्या काही महिन्यांपासून वाढीच्या दिशेने प्रवास करत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ तसेच पालघर, बोईसर या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन गृहसंकुलांची बांधकामे सुरू आहेत. या भागांमध्ये अधिकतर महारेरा मंजुऱ्या मिळाल्या आहेत. करोना काळानंतर थांबलेले किंवा विलंबित झालेले अनेक प्रकल्प पुन्हा गती घेत आहेत. या मंजुऱ्यांमुळे गृहखरेदीदारांमध्ये नव्या प्रकल्पांकडे पाहण्याचा विश्वास निर्माण होईल, असा विश्वास काही विकासकांनी व्यक्त केला आहे.

दसरा आणि दिवाळी हे स्थावर संपदा क्षेत्रासाठी परंपरेने शुभ मानले जाणारे सण आहेत. या काळात नवीन प्रकल्पांची घोषणा व विक्री मोहिमा सुरू करण्याची प्रथा आहे. यंदाही त्याला अपवाद नव्हता. महारेराने दसऱ्याच्या काळात विक्रमी मंजुऱ्या देत बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मंजूर झालेल्या या ८०९ प्रकल्पांपैकी ४०५ प्रकल्पांना नवीन नोंदणी क्रमांक, २०९ प्रकल्पांना मुदतवाढ, तर १९५ प्रकल्पांमध्ये प्रस्तावित सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे.

महारेराच्या नोंदणी विभागाचे संपूर्ण मनुष्यबळ गेल्या काही दिवसांपासून या प्रक्रियेसाठी कार्यरत होते. दसऱ्याच्या एक दिवस आधी तब्बल २०० प्रकल्पांना प्रमाणपत्रे मंजूर करण्यात आली, जे आतापर्यंतचे विक्रमी प्रमाण मानले जात आहे. महारेराने या मंजुऱ्या देताना प्रत्येक प्रकल्पाची कायदेविषयक, तांत्रिक आणि आर्थिक छाननी काटेकोरपणे केली आहे. प्रकल्पांचा नकाशा, बांधकामाचा आराखडा, आर्थिक पूर्तता आणि ग्राहकांच्या हिताचे सर्व घटक तपासूनच मंजुऱ्या देण्यात आल्याचे महारेरा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तर सणासुदीच्या या काळात मंजुऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे स्थावर संपदा क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे आणि घरखरेदीदारांना नव्या पर्यायांची दारे खुली होत आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर मंजूर झालेले हे प्रकल्प दिवाळीपूर्वी गृहनिर्माण बाजारात नवी उभारी आणतील, असा विश्वास बांधकाम क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

पुणे विभागात १२२ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, विदर्भात ३१, खानदेशात २९ तर मराठवाड्यात ९ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राची वाढ सातत्याने होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

एप्रिल २०२५ ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांत महारेराने एकूण ४,९४० प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यात २,०३९ नवीन प्रकल्पांची नोंदणी, १,७४८ मुदतवाढीचे प्रस्ताव आणि १,१५३ सुधारणा प्रस्तावांचा समावेश आहे. ही आकडेवारी राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राच्या सतत वाढत्या गतिचे द्योतक मानली जात आहे.

मुंबई आणि महानगर प्रदेशात वाढणाऱ्या लोकसंख्येचा, रोजगाराच्या संधींचा आणि पायाभूत प्रकल्पांचा विचार करता येत्या दोन ते तीन वर्षांत घरबांधणीची मागणी प्रचंड वाढेल, असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ठाणे, कल्याण, डोंबिवली मेट्रो, विरार अलिबाग कॉरिडॉर, तसेच समृद्धी महामार्गाची जोडणी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे महानगर प्रदेशाची व्याप्ती जलद गतीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महारेराकडून मिळणाऱ्या मंजुऱ्यांमुळे बांधकाम क्षेत्राला गती मिळत आहे.