लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: महावितरणच्या मुरबाड उपविभागात विशेष पथकाने शोध मोहिम राबवत ९ शेतघरे अर्थात फार्महाऊसवर होत असलेली वीज चोरी उघड केली आहे. या ठिकाणी ३० लाख ४६ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले आहे.

दोनच दिवसांपूर्वी कल्याण जवळील ग्रामीण भागात मोठया संख्येने वीज चोरांचा उलगडा केल्यानंतर शनिवारी शुक्रवारी मुरबाड तालुक्यातील विविध गावांमध्ये असलेल्या शेतघरांमध्ये विजेची तपासणी करण्यात आली. वीजचोऱ्या शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याण मंडळ एक कार्यालयाच्या विशेष पथकाने मुरबाड उपविभागात २० फार्महाऊसच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. यात ९ फार्महाऊसकडून ३० लाख ४६ हजार रुपयांची ५२ हजार ४२९ युनिट विजेची चोरी आढळून आली आहे.

हेही वाचा… ठाण्यातील ‘प्रशांत कॉर्नर’ च्या बेकायदा बांधकामासह शेडवर कारवाई

चिराड येथील निसर्ग रेसॉर्ट, जोंधळे फार्महाऊस, मनोज पाटील फार्महाऊस, पंढरीनाथ गायकर फार्महाऊस, मुरबाड येथील ओंकार फार्महाऊस, शिरावली येथील अम्मा फार्महाऊस, लाके वूड फार्महाऊस, गवाली येथील समर्थ म्हात्रे फार्महाऊस, न्हावे येथील डॅडी भोईर फार्महाऊस या नऊ फार्महाऊसमध्ये विजेचा चोरटा वापर आढळून आला आहे. चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्यास वीजचोरीचे गुन्हे दाखल होण्यासाठी तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

हेही वाचा… प्रशासकीय यंत्रणांच्या घोळात वाहनचालकाचा मृत्यू, रस्ता रूंदीकरणात वीजवाहिन्या उंच न केल्याने चालक होरपळला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडळ एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता जयश्री भोईर, सहायक अभियंते सुरज माकोडे, जयश्री कुरकुरे, दीपाली जावले, कर्मचारी किशोर राठोड, राजेंद्र जानकर, संतोष मलाये, विनोद गिलबिले, नितीन कुवर, आकाश गिरी, मधुकर चन्ने, सुभाष डोरे, संकेत मुर्तरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.