उल्हासनगरः सातत्याने कारवाई होत असतानाही उल्हासनगरातील छमछम काही थांबताना दिसत नाही. रविवारी कल्याण गुन्हे शाखेच्या घटक तीनकडून उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील पॅराडाईज बार ऍंड रेस्टॉरंटवर मोठी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बारचालक, व्यवस्थापक, वेटर, गायक महिला, बारबाला यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी उल्हासनगरात अशाच एका डान्सबारवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही शहरात ऑर्केस्ट्रा बारमधील बेकायदा गोष्टी थांबताना दिसत नाहीत.

उल्हासनगर शहरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अनेक बेकायदा प्रकार सुरू असल्याचे सातत्याने समोर आले आहे. हे ऑर्केस्ट्रा बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. या ऑर्केस्ट्रा बारवर अनेकदा कारवाई केली जाते. पोलिसांच्या कारवाईसोबतच अनेक बारवर महापालिका प्रशासनानेही कारवाई केली आहे. या ऑर्केस्ट्रा बारमध्ये छमछमसोबत अनेक बेकायदेशी प्रकार होतात. सोबतच या बारमध्ये बेकायदा बांधकामही केले जात असल्याचे यापूर्वीच्या कारवाईत समोर आले आहे. स्थापत्य बांधकामात बदल केल्याचीही प्रकरणे समोर आली होती. अशाच एका बारवर रविवारी कल्याण गुन्हे शाखेच्या घटक तीनच्या पोलिसांनी कारवाई केली.

उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर राज्यमार्गावर सतरा सेक्शन चौकाजवळ असलेल्या पॅराडाईज बार आणि रेस्टॉरंटवर रविवारी कल्याणच्या गुुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. यावेळी बारमधील बारबाला शरिरावर तंग आणि तोकडे कपडे घालून अश्लील वर्तन करताना पोलिसांना आढळून आले. बारबाला हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांवळ उभे राहून अंग प्रदर्शन करून ग्राहकांना मद्याचा ग्लास भरून देत हेतुपुरस्करपणे अश्लील हावभाव करत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. तसेच या बारबाला ग्राहकांना प्रोत्साहित करत होत्या. त्यामुळे हे सर्व करण्यास भाग पाडणारे पॅराडाईज बार आणि रेस्टॉरंटचे व्यवस्थापक मंजुनाथ शेट्टी, भागिदार तारेश शेट्टी, रोखपाल अंशुकुमार गुप्ता यांच्यासह ५ महिला गायक, २८ बारबाला, ६ वेटर्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीही कारवाई

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात यापूर्वी पेनिसुला या ऑर्केस्ट्रा बारवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापूर्वीही अनेक बारवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने होत असलेले बेकायदा प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. एप्रिल महिन्यात झालेल्या एका कारवाई कल्याण डोंबिवली महापालिकेचा एक कर्मचारीही असल्याचे उघड झाले होते. हे ऑर्केस्ट्रा बार कुणाच्या आशिर्वादाने चालतात असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.