कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरातील दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. आता गोकुळ अष्टमी, गणेशोत्सव आणि मतदार नोंदणी अभियानाचे राजकीय मंडप शहरांच्या विविध भागात रस्तोरस्ती उभी राहू लागले आहेत. अरूंद रस्त्यांवर, मुख्य वर्दळीच्या रस्त्यात मंडप उभारल्याने कल्याण, डोंबिवली शहरातील कोंडीत अडथळ्यांची नव्याने भर पडली आहे.

गणेशोत्सवाला पंधरा दिवस बाकी असताना अनेक उत्साही गणेशोत्सव मंडळांनी वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्यांचा विचार न करता मंडप उभारणीला सुरूवात केली आहे. या मंडप उभारणी करणाऱ्या मंडळांना कल्याण डोंबिवली पालिकेचे प्रभाग स्तरावरील अधिकारी, पोलीस, अग्निशमन, वाहतूक विभागाने झटपट परवानग्या दिल्याच कशा, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

डोंबिवली, कल्याण शहरांच्या अनेक भागात, रेल्वे स्थानक भागात शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी अभियानासाठी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर मंडप उभारले आहेत. काही उत्साही मंडळी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी रिक्षा वाहनतळ हटवून, मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर भव्य मंडप उभारणीस सुरूवात केली आहे. मंडप उभारणी करताना नागरिकांना होणारा त्रास, वाहतुकीला येणाऱ्या अडथळ्याचा कोणताही विचार मंडळ पदाधिकाऱ्यांकडून केला जात नाही.

डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणचा रस्ता खड्ड्यांंमुळे खराब झाला आहे. अनेक वेळा या रस्त्यावर वाहने बंद पडून वाहतुकीला अडथळा होतो. श्रीधर म्हात्रे चौकात गणेशोत्सवाला पंधरा दिवस बाकी असताना स्थानिक मंडळाने मंडपाची उभारणी केली आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीला सुरूवात झाली आहे. पालिका अधिकाऱ्यांनी या मंडपाला झटपट परवानगी दिली कशी, असा नागरिकांचा प्रश्न आहे.

अशाच प्रकारे शहराच्या अनेक भागात मंडप उभारणीसाठी रस्तोरस्ती बांबू, मंडप उभारणीचे सामान येऊ पडले आहे. अगोदरच प्रवासी नियमितच्या वाहतूक कोंडीने हैराण आहेत. त्यात आता महिनाभर शहराच्या विविध भागातील मंडपांमुळे वाहतुकीचा खोळंबा होणार असल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थचे वातावरण आहे. शहरांमधील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील मंडप वाहतुकीला मोठी डोकेदुखी ठरणार आहेत. डोंबिवली पश्चिमेत माणकोली उड्डाण पूल सुरू झाल्यापासून पंडित दिनदयाळ रस्ता, कोपर उड्डाण पुलावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील मंडपांमुळे सर्वाधिक कोंडी होणार आहे.

अनेक उत्साही गणेशोत्सव मंडळे डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ चौक, कोपर उड्डाण पूल भागातून संध्याकाळच्या वेळेत गणपती मखरात नेण्यासाठी मिरवणुका काढतात. या कालावधीत नोकरदार वर्ग कामावरून घरी येत असतो. वाहनांची शहरातील वर्दळ वाढलेली असते. यामध्ये मग मिरवणुकांची भर पडून कोंडीत आणखी भर पडते. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी रात्री अकरा ते पहाटेच्या वेळेत गणपती मखरात नेण्याच्या सूचना वाहतूक विभागाने गणेशोत्सव मंडळांना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.